लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार बुधवारी राज्यात १६ शहरांत मॉक ड्रिल घेण्यात येईल. त्यासाठी नागरी संरक्षण दलाचे १० हजार स्वयंसेवक रस्त्यावर असतील. तसेच एनसीसीचे विद्यार्थी, डॉक्टर्स आणि परिचारिकाही मदतीला असतील, अशी माहिती नागरी संरक्षण दलाचे संचालक प्रभात कुमार यांनी दिली.
मॉक ड्रिलमध्ये हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन आणि ब्लॅकआउट (वीज बंदी) परिस्थितीला कसा प्रतिसाद द्यावा, यावर भर असेल. आपत्कालीन परिस्थितीत मोबाइल आणि डिजिटल व्यवहार अयशस्वी ठरू शकतात. अशा परिस्थितीत तोंड देण्यासाठी आवश्यक रोख रक्कम जवळ ठेवण्याचे निर्देशही जनतेला देण्यात येणार आहेत. याशिवाय घरी वैद्यकीय किट, अतिरिक्त औषधे मेणबत्त्या ठेवण्याचे निर्देश दिले जातील.
ही आहेत संभाव्य ठिकाणे मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शहरांचा या मॉक ड्रिलमध्ये समावेश आहे.
हालचालींना गतीराज्य प्रशासनाने यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य शासनाने अंतर्गत स्तरावर हालचालींना गती दिली असून, सर्व पालकमंत्र्यांसह इतर मंत्र्यांना प्रशासनाशी संपर्कात राहण्याचे आदेश दिले आहेत.