मुंबई : लोकांनी सोशल मीडियावर मदतीचे आवाहन करताच राज्य सरकारतर्फे त्यांना लवकरात लवकर मदत करण्याची योजना आखली असून, त्याचा प्रत्यय अरुणाचल प्रदेशातील महिलेला नुकताच आला. सदर महिलेने ट्विटरवरून मदतीचे आवाहन करताच भाजपाच्या प्रदेश शाखेच्या प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी त्याची लगेचच दखल केली आणि सरकारची मदत तिला मिळवून दिली.रायगड जिल्ह्यातील सिद्धी इंजिनीअरिंग कंपनीत नोकरी करणाऱ्या अरुणाचलमधील मरन्या डोई या महिलेने काही कारणास्त२६ एप्रिल रोजी आत्महत्या केली. तिच्या आत्महत्येचे कारण मात्र मिळू शकले नाही. या प्रकाराची माहिती मिळताच तिची बहिण घाईघाईने तिथे पोहोचली. पण तिला स्थानिक पातळीवर कोणतीही मदत मिळत नव्हती. डॉक्टरांनीही शवविच्छेदनास नकार दिल्याने तिचा मृतदेह ताब्यात मिळत नव्हता. तेव्हा तिच्या बहिणीने लिंडा न्यूमोई या महिलेस ही बाब कळवली. लिंडा न्यूमोई यांनी ट्विटरवर या प्रकाराची माहिती टाकली आणि मरन्या डोईच्या बहिणीला मदत करण्याचे आवाहन केले. हा प्रकार श्वेता शालिनी याच्या लक्षात येताच, त्यांनी पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांना तो कळवला. आ. ठाकूर यांनी या प्रकरणात लक्ष घातले आणि मृतदेह जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन करून बुधवारी रात्री मृतदेह बहिणीच्या ताब्यात देण्यात आला. परंतु एवढ्यावरच न थांबता मृतदेह घेउन तिला अरुणाचल प्रदेशातील पासी घाट या गावी जाण्यासाठीची व्यवस्था सरकारतर्फे करण्यात आली. हे सारे केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे शक्य झाले, असे श्वेता शालिनी यांनी सांगितले. या घटनेतून राज्य सरकारचा आणि प्रशासनाचा मानवी व संवेदनशील चेहरा दिसून येतो, असेही त्या म्हणाल्या. (प्रतिनिधी)
अरुणाचलच्या महिलेला राज्य सरकारची मदत
By admin | Updated: April 29, 2016 06:05 IST