कोल्हापूर : दुष्टांचा संहार... असुरांचा नि:पात, आदिशक्ती करवीर निवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला आज, गुरुवारपासून प्रारंभ झाला. देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांतील प्रमुख देवता असलेल्या अंबाबाईची उत्सवाच्या पहिल्या माळेला सिंहासनस्थ बैठी रूपात पूजा बांधण्यात आली.आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमीपर्यंतचा कालावधी नवरात्रौत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज, गुरुवार पहाटेपासूनच श्री अंबाबाईच्या धार्मिक विधींना प्रारंभ झाला. काकडआरती, अभिषेक, पुण्यावहन, आदी विधी झाल्यानंतर सकाळी साडेसात वाजता तोफेच्या सलामीने घटस्थापना करण्यात आली. दुपारच्या आरतीनंतर देवीची सालंकृत बैठी पूजा बांधण्यात आली. उत्सवाच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेबरोबरच, अखंड दीपप्रज्वलन, मालाबंधन असे कुलाचार केले जातात. त्यामुळे या विधीला ‘देवी बसली’ असे संबोधतात. म्हणूनच नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेला देवीची बैठी रूपात पूजा बांधली जाते. ही पूजा मनोज मुनीश्वर व अनिकेत अष्टेकर यांनी बांधली. आज सकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी शासकीय अभिषेक केला. दिवसभरात देवस्थान समितीच्या कार्यालयासमोरील मंडपात श्री संतकृपा सोंगी भजनी मंडळ, पार्वती महिला भजनी मंडळ (इचलकरंजी), अक्कामहादेवी महिला मंडळ (कुरुंदवाड), हनुमान भक्त भजनी मंडळ, शिवशाहू पोवाडा मंच, शिवगंधार संगीत संस्था - मनबावरी गाणी या संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. (प्रतिनिधी) शांततेची अनुभूती...मंदिराचा परिसर अधिकाधिक मोकळा राहावा व भाविकांना प्रसन्नतेचा अनुभव मिळावा, यासाठी दक्षिण दरवाजा येथे महालक्ष्मी बँकेपासून, भवानी मंडप आणि बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार रोड या सर्व ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेशबंदी व पार्किंगवर बंदी आणण्यात आली आहे. अन्य वेळी गाड्यांमुळे गोंगाट असलेल्या परिसरात आता मात्र शांतता आहे. घरोघरी घटस्थापनानवरात्रौत्सव जसा शक्ती उपासनेचा तसाच सर्जनशीलतेचाही उत्सव. भूगर्भातून उगवणाऱ्या अंकुरातून निर्माण होणाऱ्या तसेच स्त्रीशक्तीच्या नवनिर्मितीच्या क्षमतेबद्दलचा कृतज्ञताभाव व्यक्त करणाऱ्या घटाची स्थापना आज घरोघरी करण्यात आली. देवीच्या मूर्तीसमोर पत्रावळीत काळी माती घालून त्यात धान्यांचे बी पेरण्यात आले. मध्यभागी मातीचा घट ठेवून त्यावर पाना-फुलांची माळ सोडण्यात आली. अखंड नंदादीप प्रज्वलित करण्यात आला. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखविण्यात आला. यानिमित्त महिला व्रतवैकल्ये करतात. काहीजण घटस्थापनेपासून अष्टमीपर्यंत असे उठता-बसता उपवास करतात; तर काहीजण नऊ दिवस अखंड उपवास करतात. कोल्हापुरातील वरप्राप्त देवता कात्यायनी व त्र्यंबोली देवी येथे रात्रंदिवस महिला भाविक नवरात्रकरी म्हणून बसतात.
कोल्हापूर अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ
By admin | Updated: September 25, 2014 21:22 IST