नामदेव मोरे,नवी मुंबई- गड-किल्ले हेच महाराष्ट्राच्या इतिहासाचे खरे साक्षीदार. राज्यात २६६पेक्षा जास्त किल्ले असून, रायगड हा या सर्वांत भव्य असल्यानेच त्याला ‘दुर्गदुर्गेश्वर’ ही उपाधी देण्यात आली आहे. सरकारने देशातील सर्वात भव्य शिवसृष्टी किल्ल्यावर उभारावी व त्यामध्ये शिवकालीन इतिहासातील महत्त्वाचे टप्पे, सर्व गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती किंवा छायाचित्रांसह माहितीफलक असणारे संग्रहालय उभारावे, अशी मागणी शिवप्रेमींकडून होऊ लागली आहे. पुरातत्त्व विभाग, केंद्र व राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे अस्तित्व धूसर होऊ लागले आहे. इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या किल्ल्यांवरील सर्व वास्तूंचे खंडरात रूपांतर झाले आहे. पुरातत्त्व विभागाने गड-किल्ल्यांवरील अनेक वास्तूंचा संरक्षित स्मारकांमध्ये समावेश केला असला, तरी तो फक्त नावापुरताच आहे. प्रत्यक्ष या संरक्षित वास्तूंचे चिरे ढासळू लागले आहेत. सर्वच किल्ल्यांप्रमाणे दुर्गदुर्गेश्वर रायगडही त्याला अपवाद नाही. स्वराज्याची राजधानी व अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असणारा हा किल्ला देश-विदेशातील शिवप्रेमींचे प्रेरणास्थान आहे, परंतु अद्याप किल्ल्याच्या संवर्धनासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. दुर्गप्रेमी संघटना स्वच्छता मोहीम राबवत आहेत. तरुणांसाठी रायगडवारीचे आयोजन केले जात आहे. राजश्री शिवबा विचार प्रसारक मंडळाच्या वतीने नवीन वर्षाचे स्वागतही गडावर केले जाते. इतिहास अभ्यासक व शिवप्रेमी वर्षातून अनेक वेळा किल्ल्याला भेट देत आहेत, पण सरकार मात्र किल्ल्याची डागडुजी करण्याकडे लक्ष देत नाही. केंद्र सरकारने रायगडच्या संवर्धनासाठी ६०६ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. ११ एप्रिलला शिवपुण्यतिथी दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडावर जाऊन प्रत्यक्ष घोषणा करणार असल्याने शिवप्रेमींमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. सरकारने एकत्रित विकास आराखडा तयार करून देशातील सर्वात भव्य किल्ल्याला गतवैभव मिळवून द्यावे, अशी मागणी केली जात आहे. रायगडाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. किल्ल्यावर महाराजांची समाधी, जगदिश्वर मंदिर, महादरवाजा, कोळींब तलाव, गंगासागर तलाव, काशीबार्इंची समाधी, मनोरे, कुशावर्त जवळील शिवमंदिर, गंडभेरूंड शिल्प, कचेऱ्या, सिंहासनाची जागा व नगारखाना, पालखी दरवाजा, नगारखान्यावरील शुभशकुनाचे प्रतीक असलेली द्वारशिल्पे, जगदिश्वर मंदिरावरील महाराजांच्या समाधीजवळील द्वारावरील कोरीव काम, वाघ दरवाजा, महाद्वाराजवळील भव्य प्रवेशद्वार, मेणा दरवाजा, या सर्वांच्या रचनेविषयीची माहिती व आतापर्यंतचा सर्व इतिहास येणाऱ्या पर्यटकांना समजेल, अशी माहिती किंवा भव्य प्रतिकृतींचे संग्रहालय उभारावे, अशी मागणी केली जात आहे. राज्यात २६६ किल्ले देशात सर्वाधिक दुर्ग संपत्ती महाराष्ट्रात आहे. २६६ पेक्षा जास्त किल्ले असून, त्यामधील तब्बल १११ किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधले आहेत. गड, किल्ले हीच खरी महाराष्ट्राची संपत्ती आहे, पण सद्यस्थितीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याएवढे गड सोडले तर इतरांची स्थिती बिकट आहे. किल्ल्यांचे संवर्धन व त्यांचा इतिहास सर्वांना परिचित व्हावा, दुर्गपर्यटन वाढावे, यासाठी रायगड किल्ल्यावर सर्व किल्ल्यांच्या प्रतिकृतीचे संग्रहालय उभारण्याची मागणी शिवप्रेमींनी केली आहे. रायगडावर आले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचे त्यांनी उभारलेल्या दुर्गवैभवाची तपशीलवार माहिती मिळावी. एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळाली, तर त्याचा लाभ पर्यटनवृद्धीसाठी व इतिहास अभ्यासकांसाठीही होऊ शकेल, असे मत दुर्गप्रेमी व नागरिकांनी व्यक्त केले आहे.>रायगडावरील महत्त्वाच्या घडामोडी कालावधीघडामोडी११ वे शतकयादव सत्ता१२ वे शतकयादव सत्ता व मराठा पाळेगारांचा ताबा१३ वे शतकपाळेगारांचे विजयनगरचे मांडलिकत्व१४ वे शतकसुभा रायरी निजामशाहीच्या ताब्यात१५ वे शतकनिजामशाहीचा अंमल१६ वे शतकरायरी आदिलशहाकडे आलाएप्रिल १६५६रायरीवर शिवाजी महाराजांचा अंमल सुरू१६६२रायरीचे नाव शिवरायांनी रायगड असे केले१६७२रायगडावर राजधानी वसविण्यास सुरुवात३ एप्रिल १६८०महाराजांचे महानिर्वाण१६ जानेवारी १६८१संभाजीराजे यांचा राज्याभिषेक३ नोव्हेंबर १६८९रायगड मोगलांच्या ताब्यात ८ जून १७३३पंतप्रतिनिधींनी गडाचा ताबा घेतला१८१८गड इंग्रजांच्या ताब्यात१८६९म. फुले यांनी रायगडाला भेट दिली१५ एप्रिल १८९६लो.टिळक व शि. म. परांजपे यांच्या नेतृत्वाखाली पहिला उत्सव साजरा१९३५ ते आतापर्यंतरायगडावर शिवपुण्यतिथी सोहळा साजरा होत असतो.>महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये रायगडला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी येथे असल्याने हजारो इतिहासप्रेमी गडाला भेट देत असतात. भव्य शिवसृष्टी गडावर उभारावी व तेथे सर्व गड-किल्ल्यांची माहिती देणारे संग्रहालय उभारावे. - सचिन पवार, दुर्गप्रेमी, नवी मुंबई >रायगड किल्ल्यावर व किल्ल्याच्या पायथ्याशी मराठा साम्राज्याच्या वाटचालीची माहिती देणारे संग्रहालय असावे. सर्व किल्ले, युद्ध, महत्त्वाच्या घडामोडी, शिवकालीन नाणी, हत्यारे, वेशभूषा, स्वराज्य उभारणीमध्ये महत्त्वाचा वाटा असणारे योद्धे यांची माहिती तेथे उपलब्ध व्हावी. - किरण ढेबे, शिवप्रेमी
रायगडवर उभी राहावी देशातील भव्य शिवसृष्टी
By admin | Updated: April 6, 2017 02:22 IST