सुरेश लोखंडे,ठाणे- जिल्ह्यात आचारसंहिता लागू होताच गौण खनिज महाफियांकडून मोठ्या प्रमाणात रेती, खडी आदी गौण खनिजांची अवैधरीत्या वाहतूक करण्याचा प्रयत्न माफियांनी केला. मात्र, तो फोल ठरवून अधिकाऱ्यांनी जिल्हाभरातून २२८ ट्रक जप्त केले. परंतु, या पुढे अवैध वाहतूक करणार नाही, असे हमीपत्र व दंड भरण्यास संबंधित चालकमालक टाळाटाळ करीत आहेत. अन्य कोणाच्याही दबावाला न जुमानता सुमारे १५ दिवसांपासूनही वाहने जिल्ह्यात ठिकठिकाणी उभी आहेत. दंड भरणे आणि पुन्हा असे करणार नसल्याचे हमीपत्र लिहून घेतल्यानंतरच या ट्रक सोडणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने ‘लोकमत’ला सांगितले. रेती, खडी, वाळू याचे अवैध उत्खनन कोणत्याही परिस्थितीत थांबविण्याची मोहीम जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी हाती घेतली आहे. आचारसंहितेचा गैरफायदा घेउन माफियांनी रेती, खडी, डबर, रिबीट आदींचे अवैध उत्खनन व वाहतूक करण्याचा प्रयत्न केला. मात्र दबा धरून बसलेल्या महसूल अधिकाऱ्यांनी त्यांचे प्रयत्न फोल ठरवून २२८ ट्रक जप्त केल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. ही वाहने उप विभागीय अधिकारी कार्यालये, तहसील, पोलीस ठाणी येथे उभी करून ठेवली आहेत. या वाहनाच्या मालकांकडून अवैध वाहतूक करणार नाही आणि तसे केल्यास वाहन शासन जमा करणार, असे हमीपत्र व बंधपत्र देण्याचे बंधन त्यांच्यावर आहे. याशिवाय त्यांना निश्चित केलेला दंडही भरावा लागणार आहे, असे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>सात कोटींचा दंड वसूलमागील ११ महिन्यात अवैध गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या २,८४७ ट्रक पकडले आहेत. त्यांच्याकडून सात कोटी पाच लाख १८ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या निवडणूक कालावधीच्या ८ फेब्रुवारीपासून आतापर्यंत ठाणे तहसीलदारांनी ५१ ट्रक, भिवंडीत ४०, कल्याणला २४, शहापूरला २२, अंबरनाथ आठ, मुरबाड नऊ, उल्हासनगरला नऊ आणि जिल्हा दक्षता पथकाने ६५ ट्रक पकडले.
रेती-खडीचे २२८ ट्रक जागेवरच उभे
By admin | Updated: March 1, 2017 03:49 IST