नाशिक : कांद्यांच्या संदर्भातील केंद्र सरकारचे धोरण हे शेतकरी हिताचे अजिबातच नाही. भाव न मिळण्याचे प्रकार वारंवार झाल्यानंतरही सरकारला जाग येत नसेल आणि कांद्याला जीवनाश्यक वस्तूंंच्या यादीतून वगळणार नसेल तर प्रसंगी दिल्लीचे तख्तही हलविण्याची आमची ताकद आहे, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली. भाषण आटोपल्यानंतर व्यासपीठावरून खाली उतरत असताना स्टेजचा एक भाग कोसळला. मात्र बच्चू कडू यांना काही इजा झाली नाही. व्यासपीठावरील काही पदाधिकारी पडले, ते किरकोळ जखमी झाले.
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची परिषद रविवारी येथे झाली. शेतकºयांच्या बाबतीत सरकारची भूमिका विरोधाची राहिली आहे. आश्वासन द्यायचे मात्र त्याची अंमलबजावणी करायची नाही, या भूमिकेमुळे सरकारने शेतकºयांवर आत्महत्या करण्याची वेळी आणली, असा आरोप त्यांनी केला. परिषदेसाठी जिल्हाभरातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लांबलचक व्यासपीठावर चांगलीच गर्दी झाली होती.