शिरपूर : धुळे जिल्ह्यातील शिरपूरमध्ये मंगळवारी साक्षात विश्वसुंदरी रोलीन स्ट्रॉस व मिस इंग्लंड कॅरिना टायरेल या सौंदर्यवती अवतरल्या. एका तालुक्याच्या गावी पहिल्यांदाच विश्वसुंदरी आल्याने त्यावर शिरपूरकरांचाच विश्वास बसत नव्हता. या सौंदर्यवतींनी शिरपूरकरमध्ये केवळ हजेरीच लावली नाही तर विद्यार्थी व शहरवासियांशी संवादही साधला. विश्वसुंदरी (मिस वर्ल्ड -२०१४) रोलीन स्ट्रॉस व मिस इंग्लंड कॅरिना टायरेल यांनी मंगळवारी तालुक्यातील उद्योग समूहांसह विविध शाळांना भेटी दिल्या. विश्वसुंदरीचा पुरस्कार जिंकल्यानंतर रोलीन पहिल्यांदाच भारतात तेही थेट शिरपूरसारख्या तालुक्याच्या ठिकाणी आली. रोलीन व कॅरीना येथे दोन दिवस मुक्काम करणार आहेत.इंग्लडमधील सामाजिक कार्यकर्त्या ज्युलिया मॉर्ले त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कामांना मदत करतात. उद्योगपती चिंतन अमरिश पटेल यांनी त्यांची इंग्लडमध्ये भेट घेतली होती. पटेल यांनी शिरपूर विकासाची चित्रफित त्यांना दाखविली़ त्यानंतर मार्ले यांनी शिरपुरला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार हा दौरा होत आहे. बुधवारी रोलीन व कॅरिना येथील आदिवासी भागात भेट देणार असून आश्रमशाळेतील मुलांशी संवाद साधतील. बोराडीतील जलसंधारणाच्या कामांचीही त्या पाहणी करतील. अमरिशभाई सीबीएसई स्कूल, फार्मसी कॉलेजला भेट दिल्यानंतर त्या सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. गुरुवारी त्या मुंबईकडे रवाना होतील. (प्रतिनिधी)
शिरपूरमध्ये अवतरली विश्वसुंदरी!
By admin | Updated: April 15, 2015 01:18 IST