मुंबई : चेंबूर-वडाळा या मार्गावर धावणाऱ्या मोनोरेलमधून दरदिवशी सरासरी १४ हजार २८२ प्रवासी प्रवास करत असून, मोनोच्या सुरक्षेवर महिन्याला ७६ लाखांचा खर्च येत असल्याचे माहिती अधिकारान्वये प्राप्त कागदपत्रातून समोर आले आहे.अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांना माहिती अधिकारातंर्गत मोनोरेलच्या तपशीलाबाबतचा अर्ज दाखल केला होता. यावर उप अभियंता आणि जन माहिती अधिकारी यांनी गलगली यांना दिलेल्या माहितीनुसार, २ फेब्रुवारी २०१४ रोजी मोनोरेल सुरु झाली. या प्रकल्पावर एकूण २ हजार ७१६ कोटी खर्च अपेक्षित असून, आतापर्यंत २ हजार २९० कोटी रुपये खर्च झाले आहेत. मेसर्स स्कोमी इंजिनिअरिंग बीएचडी, मलेशिया समूह आणि मेसर्स लार्सन अॅन्ड टुब्रो, इंडिया या कंपनीला २ हजार २९० अदा करण्यात आले आहेत. मोनोची ७ स्थानके आणि डेपोच्या सुरक्षेवर ७५ लाख ९६ हजार ७७ रुपये एवढा खर्च महिन्याला येत आहे. (प्रतिनिधी)
मोनोच्या सुरक्षेवर प्रतिमाह ७६ लाख खर्च
By admin | Updated: May 15, 2015 04:43 IST