शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
8
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
9
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
10
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
11
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
12
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
13
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
14
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
15
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
16
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
17
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
18
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
19
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
20
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं

शब्द जैसे कल्लोळ अमृताचे; प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती तपपूर्ती अन् ‘वक्तृत्वाची गुरुदक्षिणा’!

By विजय बाविस्कर | Updated: July 14, 2024 07:13 IST

संत ज्ञानेश्वरांची ही ओवी आठवली की डोळ्यांपुढे प्राचार्य शिवाजीराव भोसले उभे राहतात

विजय बाविस्करसमूह संपादक, लोकमत 

साच आणि मवाळ | मितुले आणि रसाळ | शब्द जैसे कल्लोळ | अमृताचे ||

संत ज्ञानेश्वरांची ही ओवी आठवली की डोळ्यांपुढे प्राचार्य शिवाजीराव भोसले उभे राहतात. महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांवर गारुड करणाऱ्या प्राचार्यांचे व्याख्यान ऐकणे ही एक बौद्धिक आणि वैचारिक आनंद देणारी गोष्ट आहे, याची जाणीव श्रोत्यांना प्रत्येक वेळी व्हायची. त्यांच्या भाषणात चिंतन करायला लावणारा चिरंतन विचार असायचा. तो मांडत असताना नर्मविनोदाच्या अनेक सरी सभागृहात प्रसन्नतेचा शिडकावा करून जायच्या. व्याख्यानं देताना त्यांच्या हातात कधीही  टिपणाचा कागद नसायचा. अफाट स्मरणशक्तीचे त्यांना वरदान लाभले होते. समाजहिताच्या कळकळीने अंतरीच्या गाभ्यातून आलेले त्यांचे वक्तृत्व एखाद्या स्वच्छ पाण्याच्या धबधब्यासारखे प्रवाही आणि लयदार होते. भाषा प्रासादिक आणि ओघवती होती. पुण्यातल्या नामवंत वसंत व्याख्यानमालेत त्यांनी सलग २८ वर्षे व्याख्याने देऊन विक्रम केला. त्यांचे लेखन व्याख्यानाइतकेच चित्तस्पर्शी होते. कथा वक्तृत्वाची, चिंतन, जागर, जीवनविध, दीपस्तंभ, देशोदेशींचे दार्शनिक, प्रेरणा, मुक्तिगाथा महामानवाची, यक्षप्रश्न, हितगोष्टी यासारख्या ग्रंथातून वाचकांना अंतर्मुख करणारे शिवाजीराव भोसले यांचे तत्वचिंतन निश्चितच भावते. 

सरांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांचे मानसपुत्र आणि त्यांची वक्तृत्वाची गादी समर्थपणे पुढे चालविणारे प्रसिद्ध लेखक आणि वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी पुढाकार घेऊन ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती’ची स्थापना केली. कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी जेव्हा अशा संस्था निर्माण होतात, तेव्हा त्यांचा भर समाजातील धनिक लोकांकडून देणग्या गोळा करून संस्था चालविण्यावर असतो. समाजासाठी अशा मोठ्या माणसांनी जे योगदान दिलेले असते, त्याची परतफेड समाजाने या रूपाने केली तर त्यात वावगे असे काही नाही. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही तत्त्वांशी तडजोड केली नाही. मानधनापेक्षा श्रोतृधन मोलाचं मानलं. ‘इतरांकडून पैसे घेऊन माझ्या नावाने कोणीही काहीही करू नये,’ एवढीच त्यांची अपेक्षा होती. या स्मृती समितीने सरांची हीच अपेक्षा पूर्ण करत त्यांच्या विचारांचेही पावित्र्य आजवर जपले आहे. सलग बारा वर्षे ही संस्था समाजातील मान्यवर व्यक्तींना ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान’ देऊन समारंभपूर्वक गौरव करत आहे. या कार्यक्रमांचा खर्च समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्राचार्यांच्या स्नुषा रंजना भोसले आणि संस्थेचे कार्यवाह प्रशांत आढाव हे तिघे मिळून करतात. आपल्या गुरूंच्या स्मृती जपताना आणि त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करताना या तिघांनी हा अनोखा स्तुत्य आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे, त्यामुळे ते निश्चितच कौतुकास आणि अभिनंदनास पात्र आहेत. 

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधूताई सपकाळ, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, न्या. नरेंद्र चपळगावकर, डॉ. रामचंद्र देखणे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डॉ. अरुणा ढेरे या मान्यवरांचा ‘प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान’ देऊन गौरव करण्यात आला आहे. या वर्षी प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आणि व्याख्याते चारुदत्त आफळे यांचा सन्मान केला जाणार आहे. श्रवणसंस्कृती आणि वाचनसंस्कृती श्रीमंत करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींचाही सन्मान या समितीतर्फे केला जातो. स्वरानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेले प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्वस्त प्रकाश भोंडे यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. 

वक्तृत्वाची समृद्ध परंपरा असणाऱ्या महाराष्ट्रात आकांडतांडव करत शब्दबंबाळ आणि प्रचारकी थाटात आवेशाने मांडणी करणाऱ्या वक्त्यांची संख्या अलीकडे खूप वाढली आहे. श्रोत्यांची संख्या रोडावण्याचे श्रेय अशा वक्त्यांनाच द्यावे लागेल. अवाजवी अभिनिवेश आणि शब्दांचा फाफटपसारा विचार हरवून बसतो, याचे भान अशा वक्त्यांना नसते. या गदारोळात प्रा. मिलिंद जोशी यांनी अभ्यासाला व्यासंगाची जोड देऊन प्राचार्यांची परंपरा पुढे नेत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्राचार्य भोसले यांच्या व्याख्यानांना हजारो श्रोते आले असतील, पण त्यांच्या वक्तृत्वाने केवळ भारावून जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. श्रोता म्हणून समोर बसणाऱ्याने वक्ता होण्याचे स्वप्न पाहिल्याचे उदाहरण दुर्मीळच म्हणावे लागेल. प्रा. मिलिंद जोशी यांनी ते स्वप्न पाहिले आणि पूर्ण केले. स्थापत्य अभियांत्रिकीचे प्राध्यापक असणारे जोशी गेली २५ वर्षे  लेखनातून आणि भाषणांतून शब्दांचे उत्तम बांधकाम करत आले आहेत. पुण्यात आणि महाराष्ट्रात यापूर्वी अनेक महनीय वक्ते सार्वजनिक कार्यक्रमांत सहभागी असायचे. ती जागा आता ते भरून काढत आहेत. प्राचार्यांच्या स्मृती जपत प्रा. जोशी यांनी आपल्या गुरूंना दिलेली ‘वक्तृत्वाची गुरुदक्षिणा’  मोलाची आहे.

प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या सत्त्वशील आणि तत्त्वशील विचारांचा जागर करण्याचे काम या स्मृती सन्मानाच्या रूपाने असेच यापुढे अविरत चालत राहील, हा सदिच्छामय विश्वास ! 

टॅग्स :Puneपुणे