तासगाव : अनेकांनी पदे घेतली, मात्र विकासाबाबत आता तेच प्रश्न उपस्थित करीत आहेत. आम्हाला पक्षात कधी घेताय? असे म्हणणारे लोक भेटत असल्याचा टोला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला.तासगाव येथील भाजपच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, भाजप हा लालकृष्ण अडवाणी, अटलबिहारी वाजपेयी किंवा नरेंद्र मोदी यांचा पक्ष नाही, तर कार्यकर्त्यांचा आणि देशहिताचा विचार करणाऱ्यांचा पक्ष आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवारांचा, शिवसेना उद्धव ठाकरेंचा व मनसे राज ठाकरेंचा पक्ष म्हणून ओळखले जातात. व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा पुरस्कार हे पक्ष करताना दिसत आहेत. नेत्यांच्या निधनानंतर त्यांचे वारसदार पक्ष चालविताना दिसतात.भाजपमध्ये असे चित्र कधीच दिसणार नाही. देशहित, विकास आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करणे हेच आमचे हिंदुत्व आहे. आमच्या हिंदुत्वावर कोणी शंका घेऊ नये.पुढे ते म्हणाले, तासगाव तालुक्यातील राजकारण दोन व्यक्तींभोवतीच फिरत राहिले आहे. याठिकाणी तिकिटाची विचारणा अधिक होत असते.कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुकाप्रमुख स्वप्निल पाटील म्हणाले, भविष्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुका लागल्यास भाजप ताकदीने लढण्यासाठी तयार आहे. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, वैभव पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, ॲड. सुखदेव कोरटे, ज्येष्ठ नेते दिलीप पाटील, माजी नगराध्यक्ष दिनकर धाबुगडे, सागर धाबुगडे, प्रशांत कुलकर्णी, महेश पाटील उपस्थित होते.
पक्षात घेता का म्हणून काही जण मागे लागलेतपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी माजी खासदार संजय पाटील यांचा पूर्ण भाषणात नामोल्लेख टाळला. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यात व्यक्तिकेंद्रित राजकारण असल्याची टीका केली. अनेकांनी पदे घेतली, मात्र विकासाबाबत प्रश्न उपस्थित केले. आम्हाला पक्षात कधी घेताय? असे म्हणणारे लोक भेटत असल्याचे त्यांनी सांगितले. मी कोणाचेही नाव घेतलेले नाही. त्यामुळे याचा संदर्भ कोणाशी जोडू नये, असे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हंशा पिकला.