मुंबई : राज्यातील सत्तारूढ भाजपा-शिवसेनेत गेले काही दिवस वादाचे ‘शोले’ भडकलेले असताना आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सलोख्याचे वृक्षारोपण केले. ‘उद्धव यांनी लावलेल्या झाडाला मी माती आणि पाणी घातलं, यातून योग्य तो संदेश जाईल,’ असे सूचक विधान करून मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांतील कटुता कमी करण्याचा प्रयत्न केला.राज्यात एकाच दिवशी २ कोटी झाडे लावण्याच्या उपक्रमानिमित्त माहीमच्या निसर्ग उद्यानातील समारंभात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर आले होते. राज्यपाल सी. विद्यासागर राव या वेळी मुख्य अतिथी होते. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार या वेळी प्रामुख्याने उपस्थित होते. गेले काही दिवस सेना-भाजपातील नेते मंडळी एकमेकांना निजामाचा बाप, असरानी, गब्बर अशी एकाहून एक सरस विशेषणे लावत शरसंधानाची एकही संधी सोडत नसताना या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेले फडणवीस आणि उद्धव यांनी व्यासपीठावर एकमेकांशी बराच वेळ कानगोष्टी केल्या. ‘जिथे गरज असेल तिथे मी खांद्याला खांदा लावून उभा राहीन. अपशकुन करणार नाही. ज्याची सुरुवात चांगली होते, त्याला यशही मिळतेच, असे उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनविभागाने राबविलेल्या या उपक्रमाचे ठाकरे यांनी कौतुक केले. तर आम्ही लावलेल्या रोपाचा वटवृक्ष होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी मित्रपक्षाशी आलेली कटुता कमी करण्याचा प्रयत्नच यानिमित्ताने केला. (विशेष प्रतिनिधी)>ट्री क्रे डिट द्यामराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी तेथे प्रत्येक गावात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे, अशी सूचना राज्यपालांनी केली. वन विभागाने ‘ट्री क्रे डिट-ग्रीन सर्टिफिकेट’सारखी योजना राबवावी. ज्या व्यक्ती किंवा कॉर्पोरेट हाउसेस वृक्ष लावू इच्छितात पण त्यांच्याकडे वेळ नाही अशांसाठी वन विभागाने मोबाइल अॅप विकसित करावे व त्याद्वारे पैसे भरून त्यांच्या वतीने वृक्षलागवडीची यंत्रणा निर्माण करावी.यासाठी राज्यातील पडीक जमिनी बेरोजगार युवकांच्या ताब्यात द्याव्यात, असे मुख्यमंत्री म्हणाले. विक्रमी वृक्षारोपणवनमहोत्सवानिमित्त केलेला २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्णत्वास गेला असून,राज्यभरातील ६५,६७४ ठिकाणी १ जुलैच्या सायंकाळपर्यंत २ कोटी २२ लाख ८२ हजार १३० वृक्षांची लागवड झाली, अशी माहिती वनमंत्री मुनगंटीवार यांनी दिली.पंतप्रधान मोदींचे टिष्ट्वटमहाराष्ट्र सरकारने अतिशय चांगला पुढाकार घेत विक्रमी वृक्षारोपण केले. लोकांनी उत्स्फूर्त योगदान दिले. याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो, असे टिष्ट्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधानांनी केलेल्या कौतुकाबद्दल आभार व्यक्त करीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी वृक्षारोपण ही लोकचळवळ झाल्याची भावना टिष्ट्वटरवर व्यक्त केली.
वादाच्या ‘शोले’नंतर सलोख्याचे वृक्षारोपण
By admin | Updated: July 2, 2016 04:44 IST