हरीश गुप्ता नवी दिल्ली : महाराष्ट्राने स्वच्छ उर्जेच्या प्रवासात एक महत्त्वपूर्ण यश मिळवले असून सौर ऊर्जा क्षमतेत ८४५० मेगावॉटचा टप्पा पार केला आहे. राज्याची एकत्रित सौर क्षमता ८,४६६.५० मेगावॅटपर्यंत पोहोचली असून, यात रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प (३,०३२.८४ मेगावॅट) आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रकल्प (५० मेगावॅट) यांचा समावेश आहे.
सरकारचे पाठबळ असलेले मेगा प्रकल्प आणि खासगी क्षेत्रातील उत्साह यांच्यामुळे सौरऊर्जेत वाढ झाली आहे. सोलापूर, धुळे, जालना, बीड आणि सातारा हे जिल्हे प्रादेशिक सौरऊर्जा केंद्र म्हणून पुढे आले आहेत. ८७९ मेगावॅट सौर प्रकल्पांसह सोलापूर आघाडीवर आहे. त्यानंतर धुळे ४९९ मेगावॅट आणि जालना ४८९ मेगावॅटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. इराई फ्लोटिंग सोलर पार्क जलसंवर्धनाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
देशभरात २४ सौर उद्याने कार्यान्वितअधिकृत सूत्रांनुसार, देशभरात १५,६३३ मेगावॅट क्षमतेची २४ सौर उद्याने कार्यान्वित झाली आहेत. त्यापैकी १२,३९६ मेगावॅट आधीच स्थापित केले गेले आहेत. ४,२७६ मेगावॅट क्षमतेसह राजस्थान आघाडीवर आहे. त्यानंतर ३,९०० मेगावॅट क्षमतेसह आंध्र प्रदेश आणि ३,१०० मेगावॅट क्षमतेसह मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. पंजाब, हरयाणा आणि पश्चिम बंगाल यासारख्या प्रमुख राज्यांनी अद्याप या योजनेंतर्गत एकही सौर उद्यान स्थापित केलेले नाही.
४ अल्ट्रा-मेगा सोलर पॉवर पार्कला मंजुरी दोंडाईचा सोलर पार्क (२५० मेगावॅट), पाटोदा सोलर पार्क (२५० मेगावॅट) आणि साई गुरू सोलर पार्क (५०० मेगावॅट) यासह चार मंजूर अल्ट्रा-मेगा सोलर पॉवर पार्क सध्याच्या सौरऊर्जा क्षमतेत १,१०५ मेगावॅटची भर घालणार आहेत.