मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) अमेरिकन शाळा उडवून देण्याचा कट आखल्याप्रकरणी एका २४वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरूणाला महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने(एटीएस) गजाआड केले आहे. अनीस अन्सारी असे या तरूणाचे नाव असून तो इस्लामिक स्टेट आॅफ इराक अॅण्ड सीरीया (इसिस) या संघटनेच्या भूमिकेने भारावला होता, असे चौकशीतून समोर आले आहे.१८ आॅक्टोबर रोजी एटीएसच्या नागपाडा युनिटने अन्सारीला कुर्ल्यातील निवासस्थानाहून अटक केली. त्याच्याविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यासह हत्येचा कट आखणे या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. विशेष न्यायालयाने त्याला २६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सीप्झमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत डिझायनर म्हणून काम करणारा अनीस गेल्या वर्षभरापासून इसीसकडे आकर्षित झाला होता. इसीसची भूमिका योग्य असून अमेरिका शत्रू आहे ही भावना त्याच्या मनावर बिंबली. तेव्हापासून तो जिहादी साहित्य वाचू लागला. जिहादी भाषणे वाचू, पाहू लागला. काही महिन्यांपूर्वी त्याने फेसबुकवर खोटे अकाऊन्ट तयार करून जिहादी विचारांच्या लोकांशी मैत्री केली. चॅटरूममध्ये तो जिहादी चर्चा करू लागला. युकेतील नॉरमन अली आणि दक्षिण आफ्रिकेतील अहमद बेदात यांची भाषणेही त्याच्याकडे सापडली. त्याच्या स्वत:च्या व कार्यालयातील संगणकामध्येही जिहादी साहित्य, छायाचित्रे व मजकूर आढळला. हे दोन्ही कॉम्प्युटर व मोबाईल एटीएसने पुढील तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. फेसबुकवरूनच त्याने वांद्रे-कुर्ला संकुलातील अमेरिकन शाळा उडविण्याबाबत कट आखल्याचे जाहीर केले होते. (प्रतिनिधी)
सॉफ्टवेअर इंजिनीअर गजाआड
By admin | Updated: October 21, 2014 03:37 IST