ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 28 - भारतात सोन्यामधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित समजली जाते. कितीही महागडे वाहन घेतले तरी, काही महिने किंवा वर्षभराने त्याच्या मुल्यामध्ये घसरण होते. पण सोन्याचे तसे नाही. अपवादानेच सोन्याच्या मुल्यामध्ये घसरण होते. उद्या अडल्या, नडल्या प्रसंगाला सोने उपयोगाला येईल या विचारातून भारतीयांची सोने खरेदीला पहिली पसंती असते.
अक्षय्य तृतीया तर, साडेतीन मुहूर्तांपैकी एक. या मुहूर्ताला सोने खरेदी लाभदायक असते. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही असे. या दिवशी सोने खरेदीमुळे घरातील सोन्यामध्ये भरभराट होते अशी मान्यता आहे. त्यामुळे या दिवशी तोळयामध्ये शक्य नसले तरी, किमान एक-दोन ग्रॅम तरी सोन्याची खरेदी केली जाते.
आज प्रतितोळा सोन्याचा दर 28,550 रुपये असून त्यावर 1.2 टक्के व्हॅट आकारला जाईल. मागच्यावर्षी अक्षय्य तृतीयेला उत्साहवर्धक सोने खरेदी झाली नव्हती. यावर्षी मात्र ग्राहक पाठ फिरवणार नाहीत असा ज्वेलर्सना विश्वास आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज प्रथमच मोठया प्रमाणावर सोने खरेदी होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्या रात्री सोने खरेदीसाठी ज्वेलर्सच्या दुकानात झुंबड उडाल्या चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळाले होते.