अवसरी : अवसरी बुद्रुकच्या हिंगेवस्ती येथील मुक्तादेवी मंदिराशेजारील पाण्याच्या डबक्यात सहा लाख रुपयांचे बंडल असलेल्या पाचशे व शंभर रुपयांच्या नोटा बाळासाहेब बबन मेंगडे या तरुणाला तरंगताना दिसल्या. या नोटा पाण्यातून काढून मंचर पोलीस स्टेशनचे विनोद गायकवाड व समीर यांच्याकडे सुपूर्त केल्याने मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे व स्थानिक ग्रामस्थांनी बाळासाहेब मेंगडे यांचे अभिनंदन केले.शिरोली बोरी (ता. जुन्नर) येथील एटीएममध्ये भरण्यासाठी २५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या दोघा ठेकेदाराला रांजणी येथील जंगलात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी २५ लाखांना लुटले. मोटारसायकलवरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना अवसरी बुद्रुक येथील रवींद्र विठोबा टाव्हरे यांच्या मोटारसायकलची धडक बसून चोरट्यासह रवींद्र टाव्हरे जबर जखमी झाले. चोरट्यांची २५ लाख रुपये असलेली बॅग रस्त्यात पडली. स्थानिक ग्रामस्थांनी मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांना घडलेला प्रकार भ्रमणध्वनीवरून कळविला. पोलीस निरीक्षक व्हॅनमधून चोरट्यांचा पाठलाग करून चोरटे गंभीर जखमी असल्याने व स्थानिक रवींद्र टाव्हरे यांना रोख रकमेसह मंचर पोलीस स्टेशनला आणून सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आले. मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोडसे यांनी एटीएम ठेकेदारासमवेत चोरलेली रक्कम मोजली असता त्यांना २५ लाखांऐवजी १८ लाख ५० हजार इतकीच रक्कम मिळाली. यापैकी ६ लाख ५० हजार रुपये कमी भरले. २५ लाख रुपयांपैकी २५ लाख ५० हजार रुपये रोकड ताब्यात मिळाली. ५० हजार रुपये अद्याप मिळाले नसल्याने त्याचा स्थानिक नागरिकांकडे तपास करून शोधून काढण्यात येईल, असे सुनील गोडसे यांनी सांगितले. (वार्ताहर)अपघात झाल्यानंतर बघ्यांची गर्दी वाढत चालली होती. मेंगडेवाडी येथील बाळासाहेब बबन मेंगडे यांना अपघात झालेल्या ठिकाणापासून ३० फूट अंतरावर ५०० रु. असलेले पाच लाख रुपये व १०० रुपयांच्या नोटा असलेले एक लाख रुपये असे एकूण सहा लाख रुपये पाण्यात तरंगताना दिसले. बाळासाहेब मेंगडे, अनिल पांडुरंग हिंगे, गुलाबराव हिंगे, मेंगडेवाडी गावचे माजी सरपंच बाळासाहेब मेंगडे यांनी मंचर पोलीस स्टेशनचे विनोद गायकवाड व समीर यांच्याकडे सुपूर्त केले. बाळासाहेब मेंगडे यांच्या प्रामाणिकपणाचे मंचर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी अभिनंदन केले.
सहा लाखांच्या नोटा सापडल्या डबक्यात
By admin | Updated: January 21, 2017 01:27 IST