आंबेगाव बुद्रूक (पुणे) : चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे एका डम्परने ५ मोटारी, २ दुचाकी आणि एका सहा आसनी रिक्षाला धडक देत सहा जणांचा बळी घेतला. गर्दीचा फायदा घेत पळून गेलेल्या डम्परचालक संतोष प्रसाद केवट याला शिंदेवाडी येथील एका डोंगरावर पकडण्यात आले.रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन मोटारींवरच हा डम्पर उलटल्याने मोटारींचा अक्षरश: चक्काचूर झाला. यातील एका मोटारीमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक मुलगी बचावली. मृतांमध्ये सातारा जिल्ह्यामधील एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. हा अपघात गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास वडगाव पुलाजवळ घडला. घटनास्थळावर डम्परमधील खडी पसरलेली होती.रवींद्र तुकाराम सावंत (३५), सारिका रवींद्र सावंत (३०), रेवती रवींद्र सावंत (१०, सर्व रा. सांगवी, ता. जावळी, जि. सातारा), सुभाष विनायक चौधरी (२९, रा. सुदाम पाटील चाळ, रामनगर, डोंबिवली), बालाजी तुकाराम राठोड (२५), महेंबर यादव गायकवाड (२३, रा. शिर्गापूर, ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद) अशी मृतांची नावे आहेत. तर भालचंद्र विठ्ठल कालुरकर (४२), रुपेश राजेंद्र पळसदेवकर (३४), बाळासाहेब विठ्ठल घाडगे (५६), शरद सर्जेराव मोरे (५४) हे गंभीर जखमी झाले आहेत. (प्रतिनिधी)
विचित्र अपघातात सहा ठार
By admin | Updated: June 12, 2015 03:49 IST