ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्हा देशातील सर्वात 'स्वच्छ' जिल्हा ठरला आहे. प्रथमच ग्रामीण भारतातील ७५ जिल्ह्यांचे स्वच्छतेच्या वेगवेगळया निकषांवर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा अव्वल ठरला आहे.
२०१६ स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. स्वच्छतेच्या आघाडीवर चांगली कामगिरी करणारे देशभरातून ७५ जिल्हे निवडण्यात आले. शौचालय, सार्वजनिक स्थळी कचरा करणे आणि पाण्याचा वापर या निकषांच्या आधारे जिल्ह्यांना क्रमांक देण्यात आले.
२०१९ पर्यंत स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोनवर्षांपूर्वी १.९६ लाख कोटींच्या महत्वकांक्षी स्वच्छ भारत मोहिमेची सुरुवात केली. मोदींच्या गृहराज्यातील अहमदाबाद, आनंद आणि पंचमहाल हे जिल्हे स्वच्छतेच्या निकषांवर अजून बरेच मागे असल्याचे या सर्वेक्षणात दिसले.
राज्य आणि जिल्ह्यामध्ये स्वच्छेतबाबत स्पर्धा वाढवण्यासाठी अशा प्रकारे क्रमांक देण्यात आले आहेत. पहिल्या पाच सर्वाधिक स्वच्छ जिल्हयांमध्ये महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. सिंधुदुर्ग पहिला, नादीया (पश्चिमबंगाल) दुस-या, सातारा (महाराष्ट्र) तिस-या, मिदानपोर पूर्व (पश्चिम बंगाल) चौथ्या आणि कोल्हापूर (महाराष्ट्र) पाचव्या स्थानावर आहे.