श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला राज्यातील प्रमुख महोत्सवाचा प्रतिष्ठित दर्जा प्रदान केला असून हा भव्य महोत्सव २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर, २०२५ या कालावधीत, घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत, धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील तुळजापूर येथे साजरा होईल. या महोत्सवा दरम्यान स्थानिक लोककला, गोंधळी गीत, भारुड, जाखडी नृत्य यांसारख्या पारंपरिक कलांचे सादरीकरण होईल. गोंधळ, भजन आणि कीर्तन यांसारख्या धार्मिक-सांस्कृतिक स्पर्धा आयोजित केल्या जातील, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
शंभूराज देसाई म्हणाले की, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री तुळजाभवानी माता अंबाबाईच्या प्राचीन मंदिरासाठी तुळजापूर हे पवित्र तीर्थक्षेत्र देशभर प्रसिद्ध आहे. या दहा दिवसीय महोत्सवात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि देशाच्या विविध भागांतून सुमारे ५० लाख भाविक श्री तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात दाखल होतात. या कालावधीत तुळजापूर शहर धार्मिक उत्साह, सांस्कृतिक वैभव आणि सामाजिक एकतेच्या रंगांनी उजळून निघते. या महोत्सवा दरम्यान स्थानिक लोककलासह राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील ख्यातनाम कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम या उत्सवाला विशेष रंगत आणतील. नवरात्र थीमवर आधारित ३०० ड्रोनद्वारे साकारलेला भव्य लाईट शो या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरेल.
महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाच्या अधिकृत संकेतस्थळ आणि युट्यूब चॅनेलवर (https://www.youtube.com/@MaharashtraTourismOfficial), महोत्सवाचे थेट प्रक्षेपण उपलब्ध असेल, ज्यामुळे देश-विदेशातील भाविक आणि पर्यटक या उत्सवाचा आनंद घेऊ शकतील. याशिवाय, जबाबदार आणि शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी व्याख्याने, चित्रकला स्पर्धा आणि मॅरेथॉन यांचे आयोजन करण्यात येईल. फॅम टूरचे आयोजन, पर्यटन विषयक कॉन्क्लेव्ह, फेअर इव्हेंटचे आयोजन करण्यात येईल. या महोत्सवामुळे तुळजापूर परिसरातील नळदुर्ग किल्ला, तेर येथील संत गोरोबा काकांचे मंदिर, येरमाळा येथील येडेश्वरी मंदिर आणि परांडा किल्ला यांसारख्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल. यामुळे स्थानिक पर्यटनाला गती मिळेल आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे
प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे म्हणाले की, श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रमुख महोत्सवाचा दर्जा देण्याचा हा निर्णय ऐतिहासिक आहे. यामुळे पर्यटनवृद्धीचे उद्दिष्ट साध्य होईल, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळेल आणि महाराष्ट्राची धार्मिक व सांस्कृतिक ओळख अधिक दृढ होईल. हा महोत्सव स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
महोत्सव महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि धार्मिक श्रद्धेचा संगम ठरेल - पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील
पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रमुख महोत्सवाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्राला नवीन दिशा मिळेल. हा महोत्सव केवळ धार्मिक नाही, तर महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला आणि सांस्कृतिक वारशाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचे प्रभावी व्यासपीठ ठरेल. म्हैसूर दसरा महोत्सवाप्रमाणे, या महोत्सवाची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणात केली जाईल, ज्यामुळे अधिकाधिक पर्यटक आकर्षित होतील.