मुंबई : प्रवाशांना उत्तम सेवा देता यावी आणि एसटीची सेवाही सुधारावी म्हणून यंदाच्या पावसाळ्यात एक अजब आवाहन प्रवाशांना करण्याच्या विचारात एसटी महामंडळ आहे. गळकी बस दाखवा, १00 रुपये मिळवा, असे आवाहन महामंडळाकडून केले जाणार असून, त्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव बुधवारी होणार्या महामंडळाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे. मुख्य बाब म्हणजे अधिकारी आणि कामगारांच्या वेतनातून पैसे कापून प्रवाशांना हे पैसे दिले जाणार आहेत. एसटी महामंडळाला आर्थिक संकटातून बाहेर पडायचे कसे, असा प्रश्न पडला असून आहे. त्यामुळे महामंडळाकडून अनेक उपाय शोधले जात आहेत. पावसाळ्यात एसटीच्या अनेक बसेसमधून गळती होत असल्याची माहिती महामंडळाकडे येत असते. तशा तक्रारीही महामंडळाकडे प्रवाशांकडून केल्या जातात. मात्र त्यात काडीमात्र सुधारणा होत नाही आणि वर्षानुवर्षे गळती होणार्या बसमधूनच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात गळणार्या बसचे प्रमाण कमी व्हावे किंवा तशा बस प्रवाशांच्या सेवेत येऊच नयेत, यासाठी महामंडळाचा प्रयत्न असून यावर जालीम उपाय काढण्यात आला आहे. गळकी बस दाखवा आणि १00 रुपये मिळवा, असे आवाहन प्रवाशांना केले जाणार आहे. अशी बस दाखवल्यास प्रवाशांना पैसे दिले जातील. मात्र हे पैसे त्या त्या आगारप्रमख आणि आगारात काम करणार्या कामगारांच्या वेतनातून कापून प्रवाशांना दिले जाणार आहेत. आगारप्रमुखांच्या वेतनातून २५ टक्के तर कामगारांच्या वेतनातून ३५ टक्के कापून हे पैसे प्रवाशांना देण्यात येतील. हा प्रस्तावही तयार करण्यात आला असून, मंगळवारी एसटी महामंडळाच्या बोर्डाच्या बैठकीत चर्चेला येणार आहे.
गळकी बस दाखवा, १00 रु. मिळवा
By admin | Updated: May 21, 2014 03:29 IST