मुंबई : माणसाच्या हृदयातील वाहिन्या स्वच्छ करण्यापासून ते महानगराच्या वाहिन्या असलेले नाले व गटारी स्वच्छ करण्यापर्यंत जे परिश्रम महापालिका करते, त्याची दखल घेतली जावी. त्यानंतरच योग्य ठिकाणी टीका जरूर व्हावी, असे चोख प्रत्युत्तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्यांचे थेट नाव न घेता दिले.मुंबईतील रस्त्यांची, गटारांची दुरवस्था कोणामुळे झाली, असा थेट सवाल करत आज काही पक्ष ‘प्रायव्हेट लिमिटेड’ बनले आहेत. पण भाजपा हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी ६ जुलै रोजी माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेवर टीका केली होती.देवेंद्र फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे यांनी नायर रुग्णालय आणि टोपीवाला महाविद्यालयातील कार्डियाक कॅथलॅब व हृदयरोग अतिदक्षता विभागाचे लोकार्पण सोहळ्यावेळी प्रत्युत्तर दिले.उद्धव ठाकरे म्हणाले, नायर रुग्णालयातील अत्याधुनिक कॅथलॅबचे लोकार्पण मी केले असले तरी कुणालाही हृदयरोग होऊ नये आणि हे सयंत्र उपयोगात आणण्याची वेळ येऊ नये, अशीच माझी भावना आहे. मुंबईकरांच्या आरोग्य सेवेसाठी महापालिका अत्याधुनिक तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देते आणि भली मोठी आर्थिक तरतूदही करते, असे ते यावेळेस म्हणाले. (प्रतिनिधी)नायर रुग्णालय आणि टोपीवाला महाविद्यालयातील कार्डियाक कॅथलॅब व हृदयरोग विभागाचे लोकार्पण करताना मुंबईकरांच्या आरोग्यासाठी पालिकेने विकास नियोजनात मोकळ्या जागा राखून ठेवाव्यात, तेथे जॉगिंग ट्रॅक बनवावेत, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी केली.
‘योग्य ठिकाणी टीका जरूर व्हावी’ - उद्धव ठाकरे
By admin | Updated: July 9, 2016 02:14 IST