मुंबई - महाराष्ट्रात २०२५ रब्बी हंगामासाठी युरियाचा तुटवडा भासू नये व शेतकऱ्यांना विहित वेळेत पीक उत्पादनासाठी युरिया मिळावा या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारच्या रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. राज्याला तातडीने युरियाचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. सध्या राज्यातील युरियाचा साठा केवळ २.३६ लाख मॅट्रिक टन इतकाच राहिला असल्याने तातडीने युरिया पुरवठा होण्याची गरज असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
या पत्रात लिहिलंय की, राज्याला एप्रिल ते जुलै या कालावधीत केंद्राकडून १०.६७ लाख मेट्रिक टन युरियाचे वाटप होणे अपेक्षित होतं. मात्र एकूण युरिया खतापैकी फक्त ७९% म्हणजे ८.४१ लाख मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला. त्यातच ऑगस्ट महिन्यात २.७९ लाख मेट्रिक टन वाटपातील केवळ ०.९६ लाख मेट्रिक टन पुरवठा मिळाला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय राज्यात खरीप हंगामातील पेरणी ९८ टक्के पूर्ण झाली असून, एकूण पेरणी क्षेत्र १४४ लाख हेक्टर आहे. विशेष म्हणजे, यंदा १४.३० लाख हेक्टरवर मक्याची पेरणी झाली असून मका पेरणी तब्बल ५४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे कापूस, मका आणि इतर पिकांसाठी टॉप ड्रेसिंग डोसची मागणी वाढली आहे असं पत्रात कळवण्यात आले आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणी टाळण्यासाठी ऑगस्ट महिन्यातील वाटपाची तातडीने पूर्तता करावी. तसेच प्रलंबित आयात पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामाचे क्षेत्र वाढणार असून आगामी रब्बीसाठी १२ लाख मॅट्रिक टन युरियाच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी अशीही विनंती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.