मुंबई : दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनी आज शिवाजी पार्कपासून सोशल नेटवर्किंग साईटवर सर्वत्र बाळासाहेबांना मोठ्या प्रमाणावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. सकाळपासूनच शिवसैनिक आणि बाळासाहेबांवर प्रेम करणाऱ्यांनी शिवाजी पार्कवर गर्दी केली. राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईत दाखल झाल्याचे चित्र शिवाजी पार्कवर पाहायला मिळाले. स्मृतिस्थळावर भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रचंड गर्दी आणि मोठी रांग असूनही वातावरणातील गांभीर्य तसूभरही कमी झाले नाही. अशीच स्थिती फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्स अॅपसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर पाहायला मिळाली. दिवसभर बाळासाहेबांच्या आठवणी जागविणारे मेसेज फॉरवर्ड केले जात होते. यात बाळासाहेबांचे उद्गार, त्यांच्या भाषणांच्या क्लिप्स्, दुर्मीळ छायाचित्रांसह श्रद्धांजली वाहणारी छायाचित्रे होती. तर, अनेक ग्रुप्सनी दिवसभरासाठी बाळासाहेब ठाकरे परिवार, एकच साहेब, आपले साहेब... अशी नावे धारण केली. भगवा झेंडा, बाळासाहेबांचे विविध फोटो ग्रुपचे आयकॉन म्हणून ठेवलेले पाहायला मिळाले. (प्रतिनिधी)
शिवतीर्थ ते सोशल नेटवर्क; सर्वत्र बाळासाहेब!
By admin | Updated: November 18, 2014 03:01 IST