मुंबई : ‘मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम’ने येथील प्रेस क्लबमध्ये आयोजित केलेल्या पाकिस्तानी छायाचित्रकारांच्या कार्यक्रमात शिवसैनिकांनी राडा घातला व आयोजक सुधींद्र कुळकर्णी यांच्या कारवरही ते धावून गेले. मात्र गोंधळ घालण्यापेक्षा एक छायाचित्रकार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाक कलाकारांच्या छायाचित्र प्रदर्शनाला हजेरी लावावी, असे आवाहन कुळकर्णी यांनी केले. पाकिस्तानमध्ये मराठी उत्सवाचे आयोजन करणार असून, त्यासाठीही सेनेच्या नेत्यांना बोलावणार असल्याचे कुळकर्णी यांनी सांगितले.कलेच्या माध्यमातून दोन देशांत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा. या फोरमअंतर्गत मुंबईतील पाच छायाचित्रकार लवकरच पाकमधील कराची शहरात जाऊन छायाचित्रे घेणार आहेत. तर गेल्या आठवड्यापासून पाकमधील पाच छायाचित्रकार मुंबईत आहेत. त्यांच्या छायाचित्रांचे ‘तस्वीर-ए-मुंबई’ आणि ‘तस्वीर-ए-कराची’ अशी दोन स्वतंत्र प्रदर्शने भरवण्यात येतील. १४ व १५ आॅगस्ट रोजी म्हणजेच दोन्ही देशांच्या स्वातंत्र्य दिनी हे प्रदर्शन मुंबई व कराचीमध्ये आयोजित केले जाईल, असे कुळकर्णी यांनी सांगितले.>मुंबईचा पाहुणचार आवडला!पाकमधील मलिका अब्बास, फराह मेहबूब, आमेन जे., मोबेने अन्सारी आणि माल्कन हचेसन हे पाच छायाचित्रकार गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आहेत. येथील विविध धर्मांच्या लोकांची त्यांनी भेट घेतली. मुंबईकरांनी केलेला पाहुणचार आवडल्याची प्रतिक्रिया या छायाचित्रकारांनी व्यक्त केली. येथील पावसाने पाहुण्यांना विशेष मोहिनी घातल्याचे त्यांच्या प्रतिक्रियांमधून जाणवले.>शिवसैनिकांचा डाव फसलाकुळकर्णी पत्रकार भवनातून बाहेर पडताच, त्यांची गाडी रोखून निदर्शने करण्याचा शिवसैनिकांचा डाव होता. त्यासाठी खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली काही शिवसैनिक मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दबा धरून बसले होते. मात्र पोलिसांनी कुळकर्णी यांना पत्रकार भवनच्या मागील बाजूस असलेल्या प्रवेशद्वारामधून गाडी नेण्याचे आवाहन केले. त्यामुळे शिवसैनिकांना त्यांची गाडी रोखता आली नाही.> पाकमध्ये पुन:प्रकाशनपाकमधील कराची शहरात १९४६ साली तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेल्या पहिल्या मराठी चरित्राचे प्रकाशन झाले होते. त्या पुस्तकाचे पुन:प्रकाशन करण्यासाठी लवकरच कराचीमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. शिवाय तेथील समुदायांच्या मदतीने मराठी, गुजराती, उर्दू, पारसी महोत्सवाचे आयोजन कराचीमध्ये करणार असल्याचेही कुळकर्णी यांनी सांगितले.
शिवसैनिकांचा पुन्हा राडा
By admin | Updated: June 29, 2016 05:17 IST