ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ असे भाजपाचे नेते सांगत असले तरी शिवसेना नेत्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. आगामी हिवाळी अधिवेशनात शिवसेना प्रमुख विरोधी पक्षाची भूमिका निभावत सरकारला धारेवर धरेल असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे भाजपाच्या नेत्यांनी सांगितले होते. रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेला मुलाखात दिली असून यात त्यांनी भाजपासोबत जाणार नसल्याचे संकेतच दिले. 'शिवसेना व भाजपामध्ये चर्चा सुरु असल्याची माहिती नसून आता आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे हे राज्याचा दौरा करत असून विविध प्रश्नांवरुन सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत असे राऊत यांनी नमूद केले. शिवसेनेने सत्तेत सहभागी व्हायचे की नाही याचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरेच घेतील असेही त्यांनी सांगितले.
----------
केंद्रात भाजपाच्या अजेंड्याला पाठिंबा
संसदेच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त रविवारी दिल्लीत केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत संजय राऊत सहभागी झाले होते. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील मतभेदाचे परिणाम केंद्रावर होणार नाही. केंद्रात आम्ही भाजपाच्या अजेंड्यालाच पाठिंबा देऊ असे राऊत यांनी सांगितले.
-----------
चंद्रकात पाटील नवीन आहेत
हिवाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेला सत्तेत सहभागी करुन घेऊ अशी भूमिका राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमधील कार्यक्रमात मांडली होती. यावरुन एकनाथ खडसेंनी पाटील यांना चिमटा काढला. 'पाटील हे नवीन असल्याने त्यांनी अशा प्रकारचे विधान केले असावे' अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली. त्यामुळे युतीवरुन भाजपा नेत्यांमध्येच मतभेद आहेत की काय अशी चर्चा रंगली आहे.