ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - मुंबईत गेल्या 25-30 वर्षांपासून शिवसेना नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे काहीही झाले तरी भाजपा शिवसेनेचा नंबर घेऊ शकत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
यावेळी शरद पवार म्हणाले की, मुंबईत गेल्या 25-30 वर्षांपासून शिवसेना नंबर एकचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांची जागा भाजपा घेऊ शकत नाही. मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना सत्तेपर्यंत पोहोचणार नाही, पण सर्वाधिक जागांसह पहिल्या स्थानावर राहील." विधानसभेतच्या निवडणुकीत भाजपाला जास्त जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपाने शिवसेनेकडे जास्त जागांचा आग्रह केला असल्याचेही शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे मुद्दे, विचार मराठी माणसाशी निगडीत आहेत. पण, मुंबईमध्ये शिवसेनेने मराठी माणसाशी संबंधित मुद्यांची स्पेस व्यापल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईमध्ये म्हणावा तसा जम बसवता आलेले नाही अशी प्रांजळ कबुलीही शरद पवार यांनी यावेळी दिली.