मुंबई : मुंबईतील रस्त्यांची, गटारांची दुरवस्था कुणामुळे झाली, असा थेट सवाल करत आज काही पक्ष ‘प्रायव्हेट लिमिटेड’ बनले आहेत, पण भाजपा हा कुणा एकाच्या मालकीचा पक्ष नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडत मुंबई महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकले.षण्मुखानंद सभागृहात भाजपा कार्यकर्त्यांसमोर बोलताना मुख्यमंत्र्यांनी मुंबई शहरासाठी सरकारने गेल्या दोन वर्षांत केलेल्या कामाचा पाढा वाचत शिवसेनेला चिमटे घेतले. ते म्हणाले, युतीचं काय होणार याबाबत माध्यमात चर्चा आहे. पण तुम्ही त्यात अडकू नका. तुम्ही फक्त बुथ सांभाळा, युतीचं आम्ही बघून घेऊ. मुंबईसाठी कोणी काय केले हे सर्वांनाच माहिती आहे. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ, एलिव्हेटेड रेल्वे, मेट्रोचे जाळे, लोकल-मेट्रो-बेस्ट अशी एकीकृत प्रवास योजना आणि स्वस्त घरांसाठी केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने धडाडीने निर्णय घेतले. मागील युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांनी मुंबईत ५५ उड्डाणपूल बांधून मुंबईचा चेहरामोहरा बदलला. सरकारने मुंबईच्या विकासासाठी ब्ल्यू-प्रिंट तयार केली आहे. यातून मुंबईकरांच्या रोजच्या हालअपेष्टांतून सुटका करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याच्या प्रारंभी कार्यकर्त्यांनी शत-प्रतिशत भाजपाच्या घोषणा देत मुंबई महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला. (प्रतिनिधी)आशिष शेलार पुन्हा मुंबई भाजपाध्यक्षपदीमुंबई भाजपा शहराध्यक्षपदी आमदार आशिष शेलार यांची फेरनियुक्ती करण्यात आली. अलीकडच्या काळात भाजपा आणि शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. शिवाय, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ९ जुलै रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री युतीबाबत काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले होते. राक्षसाला मोठे करू नका ! मेळाव्यात आशिष शेलार यांनी राक्षसाची गोष्ट सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तुलना चक्क राक्षसाशी केली. ते म्हणाले, या राक्षसावर टीका करून त्याला मोठे करू नका. बाटलीतच बंद ठेवा. शेलार यांच्या या टीकेवर शिवसेनेकडून शेलके प्रत्युत्तर दिले जाणार असल्याचे समजते.मुख्यमंत्री म्हणाले... ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळाल्या आहेत. आॅक्टोबर अथवा नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करू. आमच्याकडे २५ लाखांत बंगला बांधला जातो. मुंबईत मात्र सामान्य माणसाच्या घराची किंमतच ५० लाख आहे. सामान्य मुंबईकराला १५-२० लाखात घर मिळायला हवे. त्यासाठी मुंबईतील भूखंड मोकळे करण्याचे धोरण सरकारने स्वीकारले आहे. मात्र, या जागेवर केवळ सामान्यांची घरे उभे राहतील.
शिवसेनेमुळे मुंबई गटारात !
By admin | Updated: July 7, 2016 04:14 IST