ऑनलाइन लोकमत
कल्याण, दि. १५ - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि शिवसेनेचा मुस्लिम चेहरा म्हणून ओळखले जाणारे साबीर शेख यांचे बुधवारी दुपारी कल्याणजवळील कोनगाव येथे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते.
निष्ठावंत शिवसैनिक साबीर शेख हे शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत होते. अंबरनात मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून येणारे साबीर शेख हे युती सरकारच्या काळात कामगार मंत्री होते. ज्ञानेश्वरीचे भाष्यकार, कीर्तन आणि प्रवचनासोबतच दुर्गप्रेमी म्हणून ते प्रसिद्ध होते. पत्नीच्या निधनानंतर साबीरभाई शेख एकाकी पडले व काही महिन्यांपूर्वी त्यांना औरंगाबादमधील वृद्धाश्रमात हलवण्यात आले होते. मात्र यानंतर शिवसैनिकांनी त्यांना पुन्हा कल्याणमध्ये आणले होते. यानंतर त्यांना कोनगाव येथे पुतण्याच्या घरी ठेवण्यात आले होते. मधुमेहाने ग्रासलेल्या साबीर शेख यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालवली होती व बुधवारी दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.