NCP Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मोहोळचे आमदार राजू खरे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. आमदार खरे यांनी यापूर्वीही आपण चुकून पवार गटाकडून निवडणूक लढवली, आपण आजही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहोत, अशा आशयाचे विधान केले होते. शिंदेसेनेचे मंत्री भरत गोगावले बुधवारी जिल्ह्यात होते. आमदार खरे यांनी जाहीरपणे त्यांचे स्वागत करून पक्षाला संदेश दिला. या पार्श्वभूमीवर पवार गटाच्या नेत्यांनी पुन्हा आमदार खरे यांना संपर्क केला आणि त्यानंतर खरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
शिवसेनेच्या मंत्र्याच्या स्वागताबाबत स्पष्टीकरण देताना राजू खरे म्हणाले की, "मी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यामुळेच आमदार झालो. केवळ जुने संबंध जपण्यासाठी शिंदेसेनेच्या नेत्यांसोबत जातो," असा खुलासा आमदार खरे यांनी केला. यावर पवार गटाचे नेते तूर्त शांत असून त्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.
राजू खरेंचा विरोधकांना इशारा
"मी आमदार झाल्यापासून यांची मुरूम उपसा करणारी वाहनं तहसीलदार यांना सांगून जप्त केली. पोकलेन जप्त केले, हजार दीड हजार ब्रास दिवसाला मुरुमाचा उपसा करण्याचे काम या लोकांनी केलेले आहे. अनगरकरांची जिरवली, आता कोण झारीतील शुक्राचार्य आहे, त्यांना सांगा... आता गाठ माझ्याशी आहे, मी आमदार राजू खरे बोलतोय," अशा शब्दात आमदार राजू खरे यांनी अर्जुनसोड येथील कार्यक्रमात विरोधकांना इशारा दिला आहे.
दरम्यान, तुम्ही दादागिरी कराल तर याद राखा, खंडाळ्याचा बोगदाही उतरू देणार नाही, असा दमही राजू खरे यांनी दिला. सध्या मोहोळ तालुक्यातील बदलत्या राजकारणाची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. आ. खरे, उमेश पाटील यांच्यासह इतर नेते टीका करीत असतानाही अनगरकर शांत असल्याची चर्चा मात्र कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे.