यवतमाळ : ६१ सदस्यीय यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये भाजपा व शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे. या दोनही पक्षांनी आपल्या जागा वाढविताना काँग्रेस, राष्ट्रवादीला मायनस केले आहे. गेली पाच दशके यवतमाळ जिल्हा परिषदेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. या वेळी पहिल्यांदाच भाजपा व शिवसेनेने अधिक जागा पटकावून काँग्रेस, राष्ट्रवादीला बाहेर केले आहे. सर्वाधिक २० जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. सेनेला सहा जागांचा फायदा झाला. भाजपाने आपल्या जागा ४वरून तीन पटीने वाढवित १७वर नेल्या आहेत. काँग्रेसला १० जागांचा फटका बसला. राष्ट्रवादी काँग्रेसही तेवढ्याच जागांना मुकली. पुसद विभागाबाहेर राष्ट्रवादीचा केवळ एक उमेदवार निवडून येऊ शकला. निवडणुकीआधी भाजपाला आडवे करण्याची घोषणा करणाऱ्या महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी आपल्या विधानसभा मतदारसंघातील दिग्रस, दारव्हा, नेर या तीनही तालुक्यांतील सर्व जागा जिंकून घेतल्या. काँग्रेस सोडून ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपात गेलेल्या माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांना धूळ चारत शिवसेनेने दिग्रसचा गड काबीज केला. तिकडे भाजपात गेलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नीलय नाईक यांनी राष्ट्रवादीला अल्पसा का होईना धक्का देत दोन जागा जिंकल्या. या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला.
शिवसेना, भाजपाची मुसंडी
By admin | Updated: February 24, 2017 04:59 IST