जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत असून दुसऱ्या दिवशीही काही ठिकाणी जाळपोळ व रास्ता रोकोच्या घटना घडल्या. मात्र, त्यांच्या समर्थनासाठी अजून एकाही आमदाराने अथवा दोनपैकी एकाही खासदाराने राजीनामा दिलेला नाही.गेली चाळीस वर्षे राजकारणात असलेल्या आणि मुक्ताईनगर मतदारसंघातून सातत्याने निवडणूक येणाऱ्या खडसे यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यावर राजीनामा देण्यास भाग पाडले गेले, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र ही भावना रास्ता रोको आणि जाळपोळीतीन व्यक्त होत असल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. रविवारी चाळीसगाव येथे रास्ता रोको करण्यात आला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने १५-२० मिनिटात रस्ता रोको आटोपण्यात आला. भडगाव तालुकाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याकडे सोपवले. तर दुसरीकडे खडसे यांच्या मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे रविवारी बंद पाळण्यात आला. दरम्यान, राजीनामा दिल्यानंतरही खडसे अजून मुंबईतच तळ ठोकून आहेत. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा आहे. खडसे मंगळवारी जळगावात येणार असल्याचे सांगण्यात आले. या दौऱ्यात ते काय बोलणार, याविषयी सर्वांनाच उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)