पुणे : आग्य्राच्या बादशहापुढे छत्रपती शिवाजीमहाराजांनी झुकण्यास नकार दिला. ते म्हणाले होते, मी फक्त आई- वडील, दैवतासमोर झुकेन. वाघाला हे कसले उंदीर करणार, हा तर बाद झालेला शहा आहे, अशा शब्दांत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या टीकेची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खिल्ली उडवली.
पुण्यात शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत ठाकरे यांनी अमित शहा यांना लक्ष्य केले. शहा यांनी काल वाघाचे पुन्हा उंदीर करायचे, अशी टीका केली होती. त्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ''विजापूरच्या बादशहापुढे विडा उचलताना अफझलखान म्हणाला होता- हा पहाड का चुहा है, मैं उसे ऐसा दबाके मारूंगा. महाराजांना त्यांनी मिठी मारली., तेव्हा महाराजांनी आपली वाघनखे काढली. माझी वाघनखे समोर बसली आहेत. हे कोणाला राजकीय वर्णन आहे असे वाटेल. ज्याने त्याने ते पाहावे.''
महायुती का तुटली हे सांगताना ठाकरे म्हणाले, ''दिल्लीत सत्ताबदल झाला. जनतेने राज्यातही सोन्याचे ताट वाढून ठेवले होते. पण, काही लोकांना अनुकूल काळात विपरित बुद्धी सुचते. युद्धात आता केवळ अर्जुन (डांगळे) आपल्याबरोबर आहे.'' काल दिलेल्या त्या मताची अगोदर किंमत द्या, असे सांगत त्यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले, ''भाजपाकडे कोणता चेहरा आहे. दिल्लीच्या नावावर शेपटू हलविणारा मुख्यमंत्री हवा का?. आम्हाला या मातीत जन्मलेला, या मातीचा स्वाभिमान असलेला मुख्यमंत्री हवा आहे.''
लोकसभा निवडणुकीतच काँग्रेस व राष्ट्रवादीचे कपडे उतरविले. पुण्यातील योजनांचा दाबलेला पैसा आता बाहेर पडतोय., तुमच्या नाकर्तेपणामुळे शेतकर्यांच्या डोळ्यांतील अश्रू मला दिसतात, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ''
सभेला संपर्कनेते गजानन कीर्तीकर, प्रवक्त्या नीलम गोर्हे, रिपब्लिकन पक्षाचे अर्जुन डांगळे, माजी मंत्री शशिकांत सुतार, शहर अध्यक्ष अजय भोसले, पुणे शहरातील शिवसेनेचे उमेदवार आमदार चंद्रकांत मोकाटे, महादेव बाबर, श्याम देशपांडे, मिलिंद एकबोटे, सचिन तावरे, प्रशांत बधे, सुनिल टिंगरे, परशुराम वाडेकर आदि उपस्थित होते.
(प्रतिनिधी)
■ राजकारणाचा एक शब्दही न बोलता, तुमच्या काय योजना आहे ते मांडा, माझ्या काय योजना आहेत त्या मांडतो. मग, जनतेला निर्णय घेऊन द्या, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी सर्व पक्षांना आव्हान दिले.