विधिमंडळावर दु:खाची छायामुंबई: भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आकस्मिक निधनामुळे विधिमंडळ परिसरावर अवकळा पसरली. अधिवेशन काळातील नेहमीची गजबज, धावपळीचा मागमूसही आज दिसला नाही. संपूर्ण आवारावर दु:खाची छाया होती. आमदार, कार्यकर्ते इतकेच नव्हे तर बंदोबस्ताला असणा-या पोलिसांमध्येही मुंडे यांचीच चर्चा सुरु होती.विधिमंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत येताच माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकारांकडे मोर्चा वळविणा-या नेत्यांना आज मात्र बोलावून आणावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. राज्यमंत्री अमित देशमुख यांची प्रतिक्रिया मिळविण्यासाठी प्रतिनिधींची धडपड चालू होती. मुंडे आणि विलासराव देशमुखांच्या मैत्रीचे किस्से, आठवणींना उजाळा मिळत होता. तर, आपल्या मित्राच्या अकाली निधनाचा धक्का सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या देहबोलीतून स्पष्टपणे जाणवत होता. टीव्ही कॅमे-यासमोर बोलतानाही भुजबळांना शब्दांची जुळवाजुळव करावी लागत होती. विधिमंडळ इमारतीच्या गॅलरीत तसेच सभागृहाच्या लॉबीमध्ये आमदार आणि मंत्री ठिकठिकाणी घोळक्याने उभे होते. त्यांच्या गप्पांमध्ये मुंडे यांचे किस्से, आठवणीच होत्या. मुंडे यांच्या अचानक जाण्याने हळहळ व्यक्त होत होती. आपल्या लाडक्या नेत्याच्या जाण्याने हादरलेल्या वहुसंख्य भाजपा आमदारांनी विधिमंडळात येण्याचे टाळले. विधिमंडळ इमारतीतील भाजपा कार्यालय, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेत्यांच्या कार्यालयात शुकशुकाट होता. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांची संख्याही तुरळक होती. (प्रतिनिधी)
विधिमंडळावर दु:खाची छाया
By admin | Updated: June 4, 2014 00:33 IST