दोन अपघात : मुंबईकडे जाताना वाशिम येथे मायलेकांसह तिघांचा मृत्यू वाशिम : वास्तुशांती व लग्नसमारंभास उपस्थित राहण्यासाठी वाशिम तालुक्यातील टनका या गावी आलेले मुंबई येथील जोगेश्वरी भागातील एका कुटुंबीतील सदस्य मुंबईस परतण्यासाठी वाशिमकडे येत असताना त्यांची टोयाटो क्वॉलीस जीप रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळली. या अपघातामध्ये मायलेकीसह तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये तीन बालकांसह १0 जणांचा समावेश आहे. ही घटना वाशिम ते हिंगोली महामार्गावरील तोंडगाव फाट्यानजीक २४ मेच्या उत्तररात्री ३ वाजताच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये सिंधू डिगांबर भालेराव, वैष्णवी डिगांबर भालेराव (माय-लेकी) व वसंत योगीराज कांबळे या तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गंभीर जखमीमध्ये सुवर्णा वसंत कांबळे, प्रणिता विजय इंगोले, गुंजन विनोद राऊत, सचिन वसंत कांबळे, स्नेहा वरुण कांबळे, तन्वी विनोद राऊत, वेदांत विनोद इंगोले, विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले यांचा समावेश आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे वास्तव्य असलेले डिगांबर रामा भालेराव यांचे कुटुंब गेल्या १५ ते २0 वर्षांंंंपासून जोगेश्वरी वेस्ट मुंबई येथे वास्तव्य करीत आहेत. वाशिम तालुक्यातील सोंडा व टनका येथे वास्तुशांती व लग्नसमारंभाच्या निमित्ताने भालेराव, इंगोले, राऊत व कांबळे कुटुंब आले होते. यामध्ये डिगांबर रामा भालेराव, त्यांच्या पत्नी सिंधू डिगांबर भालेराव, मुलगी वैष्णवी डिगांबर भालेराव (१४), वसंत योगीराज कांबळे (३६), सुवर्णा वसंत कांबळे (२८), प्रणिता विजय इंगोले (२५), गुंजन विनोद राऊत (३0), सचिन वसंत कांबळे (१५), स्नेहा वरुण कांबळे (९), तन्वी विनोद राऊत (४), वेदांत विनोद इंगोले (३), विनोद धोंडबा राऊत व वाहन चालक विजय देवीदास इंगोले (२८) यांचा समावेश आहे. हे कुटुंब मुंबईहून वाशिमला १७ मे रोजी आले होते. या कुटुंबाने नातेवाईकाकडील वास्तुशांती व लग्नसमारंभाचे कार्यक्रम आटोपले. आपल्या नातेवाईकाकडील सर्व कार्यक्रम आटोपल्यानंतर वाशिम तालुक्यातील टनका येथून २४ मे रोजी रात्री २ वाजता मुंबईकडे परतीच्या प्रवासाला निघाले. परतीच्या प्रवासाला वाशिमकडे येत होते. दरम्यान, तोंडगाव फाट्याजवळ रस्त्यावर नादुरुस्त अवस्थेत सीजी 0७ सीए 0८६७ क्रमांकाचा ट्रक उभा होता. या ट्रकला रिफ्लेक्टर व इंडिकेटर नसल्याने वाहनचालक विजय इंगोले याला ट्रक दिसला नाही. भरधाव वेगात असलेली क्वॉलीस जीप उभ्या ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की क्वॉलीस जीपचा अक्षरश: चुराडा झाला. (प्रतिनिधी)
यवतमाळातील सात ठार
By admin | Updated: May 26, 2014 01:12 IST