सोलापूर : महापालिकेत उपमहापौर कार्यालयात गेल्या आठवड्यात झालेल्या डोंगरे-कोल्हे यांच्या ‘फ्री स्टाईल्स’ची गंभीर दखल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी घेतली असून, उपमहापौर प्रवीण डोंगरे आणि नगरसेवक तथा पालिकेतील पक्षनेते दिलीप कोल्हे यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच यासंदर्भात खुलासा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्याबरोबर वारंवार फिरत असल्याचा राग मनात धरून कोल्हे यांनी उपमहापौर प्रवीण डोंगरे यांच्या कानाखाली लगावली होती़ त्यानंतर दोघांमध्ये झालेल्या गुद्दागुद्दीचे पडसाद शहरात उमटले होते़ आठ दिवसांनंतर तटकरे यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष मनोहर सपाटे यांनी नोटिसा बजावून दोघांनाही आठ दिवसांत खुलासा करण्यास सांगितले आहे. राष्ट्रवादी नगरसेवकांच्या विरोधात भूमिका घेणे, मनपा निधीतून विहिरीतील गाळ काढला तरीही त्या पाणीउपशामधून पैसे कमविणे, मराठा सेवा संघाचे गाळे आयुक्तांना पाडायला लावणे यास आपण कारणीभूत असल्याचे कोल्हे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीत नमूद केले आहे़ कोल्हे यांच्या अशा वागणुकीमुळे महापालिकेत राष्ट्रवादीची बदनामी होत असल्याचेही त्यात म्हटले आहे़
उपमहापौर मारहाण प्रकरणाची गंभीर दखल
By admin | Updated: December 29, 2014 05:03 IST