कराड - अमेरिकेतील बहुचर्चित एपस्टीन फाईल्सबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुन्हा एकदा खळबळजनक दावा केला आहे. १९ डिसेंबरला अमेरिकन काँग्रेसने एपस्टीन फाईल्समधील अंशत: माहिती सार्वजनिक केली आहे. जवळपास ३० हजार फोटो, ईमेल आणि अन्य डेटा यात असल्याने ही संपूर्ण फाईल सार्वजनिक करण्यासाठी आणखी काही आठवडे लागतील असं तिथल्या अटॉर्नी जनरल यांनी सांगितले आहे. १९ तारखेला फाईलमधील काही माहिती समोर आली. त्यात केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचा उल्लेख आढळला आहे. त्याशिवाय मोदी ऑन बोर्ड असा एपस्टीनने पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहिले आहे त्यामुळे त्याबाबत सरकारने खुलासा केला पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
कराड येथील पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, एपस्टीन फाईलमध्ये अनेक फोटो आहेत. त्यात स्वत: डोनाल्ड ट्रम्प यांचे फोटो असल्याने ते दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या खासदाराने एपस्टीन फाईल्सबाबत विधेयक मांडले होते, ते मूळ भारतीय वंशाचे आहेत. त्यांनी एका मुलाखतीत आम्ही जारी केलेले पुरावे पाहत आहोत पण आमचे समाधान होत नाही असं म्हटलं आहे. अमेरिकन सरकारकडून काही माहिती लपवण्याचा प्रयत्न होत आहे. जी माहिती समोर आली आहे त्यातील ईमेलमध्ये काही उल्लेख भारतीयांचा आहे. केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांचं नाव एका ईमेलमध्ये आहे असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय ट्रम्प यांच्या प्रशासनातील एक मोठा अधिकारी ज्याला भारताच्या पंतप्रधानांना भेटायचे होते. त्याने एपस्टीनला ईमेल केला होता. त्यानंतर काही दिवसांनी मोदी ऑन बोर्ड असं उत्तर एपस्टीनकडून त्याला मिळाले होते. याचा अर्थ मोदी भेटायला तयार आहेत. आता मोदी आणि एपस्टीन यांचं काय नाते आहे? जो मोदींची भेट कुणालाही देऊ शकतो याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल. त्यासोबत एक माजी खासदार आणि मोठे उद्योगपती अनिल अंबानी यांचेही नाव आहे. अमेरिकेत राहणारे भारतीय वंशाचे आरोग्य क्षेत्रातील मोठे व्यक्ती आहेत त्यांच्याही नावाचा उल्लेख आहे. अजूनही या फाईल्समध्ये काय काय माहिती आहे याचा शोध घेतला जात आहे. ही माहिती सार्वजनिक असल्याने कुणालाही सहज उपलब्ध होईल असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अमेरिकेन संसदेकडून एपस्टीन फाईल्सबाबत स्वतंत्र वेबसाईट बनवली आहे. त्यात सगळी माहिती वाचता येईल. आतापर्यंत खटल्यात काय काय समोर आले ती प्रचंड सामुग्री डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचे विश्लेषण करायला काही काळ लागेल. मला जी माहिती अमेरिकन माध्यमातून मिळाली त्यातून भारताच्या राजकारणात एपस्टीन फाईलचे परिणाम होतील असं मला वाटत होते. मी कुणाचेही नाव याआधी घेतले नव्हते. भारताच्या राजकारणात आमुलाग्र बदल होईल असं विधान मी केले होते. त्याची खूप चर्चा झाली. देशभर ते विधान गाजले. बाल लैंगिक शोषणाचे हे प्रकरण फार गंभीर आहे. अमेरिकेत यावर संघर्ष सुरू आहे. एपस्टीन फाईलबाबत माहिती समोर यायला आणखी काही आठवडे लागतील असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
मोदी आणि एपस्टीन संपर्क कसा?
एपस्टीन फाईल्समधून काही नावे समोर आलीत, त्यात त्यांनी गुन्हा केलाय का हे सांगता येणार नाही. परंतु एपस्टीनसोबत यांचे संबंध कसे आले हा प्रश्न आहे. २००८-०९ या काळात एपस्टीनला लैंगिक शोषणाखाली शिक्षा झालीय. तो गुन्हेगार आहे सगळ्यांना माहिती होते. मोदींचा संदर्भ २०१४ मधला आहे. एपस्टीन हा विकृत प्रवृत्तीचा माणूस आहे. देहव्यापार करतो हे माहिती असताना मोदी आणि एपस्टीन यांची गाठ कुणी घालून दिली? हरदीप पुरी हे अमेरिकेत भारताचे राजदूत होते. त्यांचेही नाव आलं आहे. हे सगळे शोधावे लागेल असं सांगत भारत सरकारकडून यावर खुलासा होत नाही हा चिंतेचा विषय आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
Web Summary : Prithviraj Chavan claims Epstein files mention Modi and Minister Puri. He demands government clarification on alleged links, raising concerns about potential implications for Indian politics. Investigation urged.
Web Summary : पृथ्वीराज चव्हाण का दावा है कि एपस्टीन फाइलों में मोदी और मंत्री पुरी का उल्लेख है। उन्होंने कथित संबंधों पर सरकार से स्पष्टीकरण मांगा, जिससे भारतीय राजनीति के लिए संभावित निहितार्थों के बारे में चिंताएं बढ़ गईं। जांच का आग्रह किया।