मुंबई : वडाळ्यातील एका झुडपात पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने शुक्रवारी खळबळ उडाली. तौसिफ नौशाद शेख असे मृत मुलाचे नाव आहे. गळा दाबून त्याची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणी वडाळा टी.टी. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.वडाळा टी.टी. परिसरात तौसिफ हा कुटुंबीयांसोबत राहतो. गुरुवारी रात्री घराबाहेर खेळत असताना अचानक तो गायब झाला. रात्री दीड वाजता कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे त्याच्या हरविल्याबाबत माहिती देण्यात आली. पोलिसांकडून मुलांचा शोध सुरू केला. रात्रभर शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने शुक्रवारी सकाळी ७ च्या सुमारास वडाळा टी.टी. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.तासाभरातच येथील शांतिनगर परिसरातील खाडीलगत असलेल्या झुडपात त्याचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात गळा दाबून त्याची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. तौसिफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. त्याच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. कुटुंबीयांसह मित्र, नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत. परिसरातील सीसीटीव्हींचाही शोध घेण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती वडाळा टी.टी. पोलिसांनी दिली.
वडाळ्यातील एका झुडपात पाच वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:38 IST