मुंबई : महायुतीमध्ये भाजपाला १६ अतिरिक्त जागा जागा सोडायला शिवसेना तयार झाली असून, मित्रपक्षांना द्यायच्या १८ जागा भाजपाने त्यातून सोडाव्यात, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे समजते. यामुळे शिवसेनेच्या वाट्याला १५३, भाजपाच्या वाट्याला १३५ जागा येतील. सध्या महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अडखळण्याचे कारण शिवसेनेच्या या फॉर्म्युल्यात असल्याचे बोलले जात आहे.शिवसेना-भाजपा युतीमधील जागावाटप हे विधानसभेकरिता आतापर्यंत शिवसेना १७१ तर भाजपा ११७ हेच राहिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत घाटकोपर आणि त्यापूर्वी चिमूर या दोन जागा शिवसेनेने भाजपाला सोडल्याने जागावाटप शिवसेना १६९ तर भाजपा ११९ झाले होते.गेले काही दिवस भाजपा मित्रपक्षांसोबत जागावाटपासंबंधी चर्चा करीत आहे. आपल्याकडील कोणत्या जागा मित्रपक्षांना हव्या आहेत, याची माहिती मिळाल्यानंतर आता शिवसेनेने भाजपाला १३५ जागा द्यायची तयारी केली आहे. त्यामध्ये मित्रपक्षांना हव्या असलेल्या व शिवसेनेला सोडणे शक्य असलेल्या जागांचा समावेश आहे.मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या ११९ जागा होत्या. त्यामुळे भाजपाला १६ जागा वाढवून मिळतात. मात्र रिपाइं, स्वाभिमानी, शिवसंग्राम व राष्ट्रीय समाज पक्षाला द्यायच्या जागा भाजपाने त्यांच्या वाढलेल्या कोट्यातून द्याव्या, असा शिवसेनेचा आग्रह आहे असे समजते. तसे झाल्यास १६ जागा वाढवून मिळाल्या तरी मित्रपक्षांना १८ जागा सोडल्यावर भाजपाला प्र्रत्यक्ष लढायला ११७ जागा मिळतात. तात्पर्य हेच की, शिवसेनेकडून जागा वाढवून घेतल्याचे भाजपाला समाधान तर भाजपाला ११७ जागांपुरते सीमित ठेवल्याचा शिवसेनेला आनंद! रिपाइं व स्वाभिमानला प्रत्येकी सहा-सहा जागा व शिवसंग्राम तसेच राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येकी तीन-तीन जागा भाजपाने सोडायच्या आहेत, असे कळते.मागील निवडणुकीत शिवसेना १६९ जागा लढली. त्यापैकी ११ जागा शिवसेनेने शेकाप व अन्य काही मित्रपक्षांना सोडल्या होत्या. म्हणजेच शिवसेना प्रत्यक्षात १५८ जागा लढली होती. सेनेच्या या फॉर्म्युलात शिवसेना १५६ जागा लढते. याचा अर्थ मित्रपक्षांना जागा सोडूनही शिवसेनेच्या मागील निवडणुकीत लढलेल्या जागांच्या तुलनेत दोन जागा कमी होतात. २००९ च्या निवडणुकीत शिवसेना व भाजपाने लढवलेल्या जागांमधील अंतर ५० होते. यावेळी हे अंतर ३९ असेल. शिवसेनेचे हे सूत्र हाच सध्या महायुतीच्या जागावाटपाच्या चर्चेतील गतीरोध असल्याचे मित्रपक्षाच्या नेत्यांचे मत आहे. (विशेष प्रतिनिधी)
सेनेचा ‘मखलाशी’ फॉर्म्युला
By admin | Updated: September 11, 2014 09:20 IST