अतुल कुलकर्णी, मुंबई राज्यातील भाजपाने विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर शिवसेनेकडे विरोधीपक्षनेतेपद आले असले तरी दोन्ही पक्षांत चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची थेट केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज व लालकृष्ण आडवाणी यांच्याशी चर्चा झाली असून, राज्याचे प्रभारी राजीवप्रताप रुडीदेखील त्याच कारणासाठी गुरुवारी मुंबईत आले होते. रुडी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बंददाराआड चर्चा केली. त्यामुळे २५ नोव्हेंबर रोजी होणारा मंत्रिमंडळ विस्तार आता २९ किंवा ३० नोव्हेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. विरोधीपक्षनेतेपद स्वीकारल्यानंतरही शिवसेनेची सत्तेत जाण्याची आशा अजून संपलेली नाही. पंधरा वर्षे सत्तेबाहेर राहिलेल्या कार्यकर्त्यांचा धीर आता सत्ता नाही म्हणून सुटत चाललेला आहे. त्यामुळे कार्यकर्ते, पदाधिकारी टिकवायचे असतील तर सत्तेत गेलेच पाहिजे अशी भावना पक्षात वाढते आहे. १० मंत्रिपदे राज्यात आणि २ मंत्रिपदे केंद्रात पाहिजेत, अशी मागणी शिवसेनेने केली असून, उपमुख्यमंत्रिपदाचा दावा शिवसेनेने मागे घेतल्याचे समजते. मात्र ५ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्रिपदे शिवसेनेला देण्याची भाजपाने तयारी दाखवली आहे. सेनेला गृहखाते हवे आहे पण भाजपा ते खाते सोडण्यास तयार नाही.
सेनेची सुषमा स्वराज, आडवाणींशी चर्चा सुरू
By admin | Updated: November 21, 2014 02:56 IST