ज्येष्ठ नागरिकांना सवलतीत शिवशाही प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2018 06:03 AM2018-05-30T06:03:56+5:302018-05-30T06:03:56+5:30
भाडेतत्त्वावरील वातानुकूलित शिवशाहीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दराची सवलत देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे.
मुंबई : भाडेतत्त्वावरील वातानुकूलित शिवशाहीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दराची सवलत देण्याची घोषणा परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केली आहे. बैठ्या आसनी शिवशाही तिकीट दरांत ४५ टक्के आणि शयनयान आसनी शिवशाहीत ३० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या घोषणेची अंमलबजावणी १ जूनपासून करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ७०व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात वातानुकूलित प्रवास करण्याची योजना राज्यभर लागू करण्यात येणार आहे.
सद्य:स्थितीत एसटी महामंडळाच्या पारंपरिक साध्या, रातराणी व निमआराम बसमधून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास तिकिटात ५० टक्के सवलत मिळते. ही सवलत नव्याने दाखल होणाऱ्या शिवशाहीमध्ये लागू नसल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. शिवशाही ही एसटीची सेवा असल्याने सवलतीत प्रवास करण्यास मुभा देण्याची मागणी नागरिकांनी केली होती. मंत्री रावतेंनी प्रस्ताव तयार करून शिवशाहीतही सवलतीत प्रवास करण्याची परवानगी देण्याची घोषणा केली.