मुंबई : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपाचे सरकार स्थिर झाले. शिवसेनेकरिता आत्मसन्मान महत्त्वाचा असला तरीही शिवसेना अर्ध्यातूनच सरकारमधून बाहेर पडणार नाही. भाजपाकडून आम्हाला केवळ प्रेम आणि आत्मियतेची अपेक्षा आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले. देसाई यांच्या या वक्तव्याने सरकारच्या भवितव्याबाबत उपस्थितीत झालेल्या वादावर पडदा पडल्याचे मानले जात आहे. पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर बोलण्याचा हक्क केव्हाच गमावला आहे. सरकार गमावल्याने पवार वैफल्यग्रस्त झाल्याने शिवसेनेवर टीका करीत आहेत. साहित्यिकांच्या राजीनामा सत्राकडे देसाई यांचे लक्ष वेधले असता केंद्राने साहित्यिकांच्या कृतीची दखल घेतली पाहिजे, असे ते म्हणाले. डान्सबार बंद राहावेत याकरिता पूर्वीच्या सरकारने योग्य ती खबरदारी घेतली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने सरकारने केलेली दुरुस्ती रद्द केली. परंतु आमचे सरकार यातून योग्य मार्ग काढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
सेनेचे मंत्री राजीनामा देणार नाहीत - देसाई
By admin | Updated: October 16, 2015 03:13 IST