मुंबई : भाजपाकडून प्रस्ताव येण्याची वाट पाहणाऱ्या शिवसेनेने अखेर नमते घेतले असून, शिवसेना नेते सुभाष देसाई व अनिल देसाई हे दिल्लीत नवनियुक्त प्रभारी जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याकरिता रवाना झाले आहेत. भाजपाचे नेते शिवसेनेला फार महत्त्वाची मंत्रिपदे देण्यास तयार नाहीत.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तसेच निवडणूक प्रभारी ओम माथूर यांच्याशी बोलत होते. महाराष्ट्रातील नेत्यांशी बोलण्याचे त्यांनी टाळले होते. मात्र माथूर यांची मंगळवारी दुपारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. त्यानंतर माथूर यांनी राज्यात कोणत्याही परिस्थितीत भाजपा सरकार स्थापन करणार व कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही, असे स्पष्ट संकेत सेनेला दिले. बदलत्या राजकीय परिस्थितीचा व ताकदीचा अंदाज घेऊन जो आपली भूमिका बदलतो तोच खरा नेता असतो, असे विधान माथूर यांनी केले. भाजपाला सत्ता स्थापन करण्यास २२ आमदार हवे आहेत. त्यामुळे पाच अथवा सात आमदारांच्या मागे एक याप्रमाणे शिवसेनेला जास्तीत जास्त दोन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळतील, असे समजते. भाजपाचा प्रस्ताव प्राप्त झाल्यावर सुभाष व अनिल देसाई मुंबईत येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करतील व त्यानंतर शिवसेना पाठिंब्याचा निर्णय घेईल, असे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला बिनशर्त पाठिंबा देऊ केला आहे. मात्र हा पाठिंबा घेण्यावरून भाजपामध्ये दोन मतप्रवाह आहेत. (विशेष प्रतिनिधी)
सेनेने घेतले नमते
By admin | Updated: October 22, 2014 06:24 IST