नागपूर : मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या सुमारे ५५ एकर जागेवर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यावर गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्य सरकारने त्यासाठी नेमलेल्या पॅनलने सध्याच्या ही जागा देण्यास तयारी दर्शविली आहे. विशेष म्हणजे, याच प्रश्नावर गेल्या महिन्यात सचिव स्तरावरदेखील बैठक झाली होती.मेडिकलच्या टीबी वॉर्डाच्या जागेवर एम्स रुग्णालय, मध्यवर्ती कारागृहामागील व लघु सिंचन विभागाची मिळून सुमारे १३० एकर जागेवर जिथे सागवानाची झाडे व मोकळा परिसर आहे तिथे एम्सचे कॉलेज तर अजनी रेल्वे स्टेशनसमोर असलेल्या मेडिकल वैद्यकीय वसाहतीच्या १७ एकर जागेवर वसतिगृह व एम्सच्या डॉक्टरांचे निवासस्थान उभारण्याचे प्रस्तावित आहे. सध्या टीबीचा वॉर्ड, जुने वसतिगृह, क्लासवन ते चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आहेत. या जुन्या इमारती जमीनदोस्त करून तेथील कर्मचाऱ्यांना मेडिकलच्या परिसरात इतरत्र पर्यायी जागा उपलब्ध करून देता येऊ शकते, यावरही या पॅनलने पर्याय सुचविला आहे. मेडिकल परिसरात सध्या अधिष्ठात्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील जागादेखील मोकळी आहे. याशिवाय अधिकाऱ्यांची अनेक निवासस्थाने पडिक आहेत. कर्मचारी निवासस्थानासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या पाठीमागील १८ एकर जागा पडिक आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांसाठी तीन मजली निवासस्थान उभे केले जाण्याचे प्रस्तावित आहे. हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. राज्य सरकारने एम्ससाठी जागा निश्चित करून त्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविणे अपेक्षित आहे. आरोग्य खात्याच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्या नेतृत्वाखाली हा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. यासंदर्भात स्थानिक स्तरावर चर्चा करण्यासाठी म्हैसकर यांनी हे पॅनल नियुक्त केले आहे. कर्मचाऱ्यांच्या नवीन निवासस्थानासाठी अंदाजे २०० कोटी रु पयांचा खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भातील प्रस्ताव तयार केले जात असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षापासून थंडबस्त्यात पडलेल्या केंद्रीय पॅरामेडिकल प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावावरही हालचाली होण्याची दाट शक्यता आहे. (प्रतिनिधी)
‘एम्स’साठी टीबी वॉर्डाच्या जागेवर शिक्कामोर्तब
By admin | Updated: October 28, 2014 00:23 IST