मुंबई : निवडणुकीच्या काळात बेस्ट भाडेवाढ टाळण्यासाठी दीडशे कोटींचे अनुदान जाहीर करणाऱ्या पालिकेच्या तिजोरीतून अखेर मोठ्या प्रतीक्षेनंतर दुसरा हप्ता निघाला आहे़ त्यानुसार या अनुदानाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या बेस्ट उपक्रमाला १९ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता लवकरच मिळणार आहे़ मात्र विविध स्रोतांतून मिळणाऱ्या उत्पन्नातून ही रक्कम देण्यात येणार असल्याने बेस्टला पुढच्या हप्त्यासाठी वाटच बघावी लागणार आहे़ आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाने भाडेवाढ करण्याचा निर्णय गेल्या वर्षी घेतला़ मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात ही भाडेवाढ घातक ठरण्याची चिन्हे असल्याने पालिकेतील सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने स्वतंत्र नागरी परिवहन निधी असे खाते उघडून त्या अंतर्गत १०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन बेस्टला दिले़ मात्र भाडेवाढ टाळल्यास बेस्टला दीडशे कोटींचे नुकसान होत असल्याने पालिकेने दीडशे कोटी रुपये देण्याचे कबूल केले़मात्र सशुल्क वाहनतळ योजना, रस्त्यांखालून जाणाऱ्या उपयोगिता संस्थांच्या वाहिन्यांकरिता आकारलेले शुल्क, सार्वजनिक वाहनतळ उभारणीतून मिळणारे प्रिमियम यातून काही रक्कम बेस्टच्या तिजोरीत टाकण्यात येणार आहे़ त्यामुळे १ एप्रिल ते ३० आॅक्टोबर या कालावधीत मिळालेल्या ५६़५१ कोटींच्या उत्पन्नापैकी ३७़५० कोटी रुपयांचा पहिला हप्ताच देण्यात आलाहोता़ त्यामुळे या मदतीच्या आशेवर असलेल्या बेस्टची अवस्था आणखी बिकट झाली होती़ अखेर १९ कोटींचा दुसरा हप्ता देण्याची तयारी प्रशासनाने आता दाखविली आहे़ (प्रतिनिधी)
बेस्टच्या तिजोरीत १९ कोटींचा दुसरा हप्ता
By admin | Updated: November 4, 2014 03:10 IST