मुंबई : सुप्रसिद्ध पटकथाकार गजानन कामत यांचे मंगळवारी सायंकाळी दादर येथील शुश्रूषा रुग्णालयात निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. काही दिवसांपूर्वी घरात पडल्याने त्यांना फ्रॅक्चर झाले होते. याच कारणास्तव त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री रेखा कामत आणि दोन कन्या आहेत.गजानन कामत यांची हिंदी-मराठी चित्रपटकथा लेखक म्हणून ख्याती होती. ते मुंबईच्या रुईया कॉलेजातले न.र. फाटक यांचे शिष्य. ‘मौज’ आणि ‘सत्यकथा’ या मराठी मासिकाचे संपादक म्हणूनही त्यांची कारकीर्द गाजली होती. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री रेखा कामत यांच्याशी १९५३ साली त्यांचे लग्न झाले होते. लाखाची गोष्ट (सहलेखक-ग.दि. माडगूळकर), अनिता (१९६७), कच्चे धागे (१९७३), काला पानी (१९५८), तेरी माँग सितारोंसे भर दूँ (१९८२), दो चोर (१९७२), दो प्रेमी (१९८०), दो बदन (१९६६), दो रास्ते (१९६९), पुकार (१९८३), बंबई का बाबू, बसेरा (१९८१), मनचली (१९७३), मैं तुलसी तेरे आँगन की (१९७८), मेरा गाँव मेरा देश (१९७१), मेरा साया (१९६६) या चित्रपटांचे पटकथा लेखन कामत यांनी केले होते. (प्रतिनिधी)
पटकथाकार गजानन कामत यांचे निधन
By admin | Updated: October 7, 2015 02:35 IST