ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 27 - पाच कि.मी. पायपीट करून ‘अ, ब, क, ड’ गिरविणाऱ्या अनाथांसाठी सेवाव्रती संघटना, ग्रुप सरसावले आहेत. स्कूल बस खरेदी करून या मुलांची पायपीट थांबविण्यासाठी औरंगाबादेत शनिवारी नि:शुल्क सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे या अनाथांसाठी वाशिमच्या अंध मुलांचा आॅर्केस्ट्रॉ सादर करणार आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई शहरापासून पाच कि.मी. अंतरावर प्रीती व संतोष गर्जे या दाम्पत्याने सहारा अनाथालयाची उभारणी केली. कैदी मुले, आत्महत्याग्रस्त शेतकरी, वेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या मुलांसह पीडित, निराश्रित, अनाथांचा सांभाळ येथे केला जातो. सध्या येथे ८८ मुले राहत असून, यामध्ये ३८ मुलींचा समावेश आहे. यापैकी ७४ मुले (यातील ३४ मुली) शिक्षणासाठी पाच कि.मी. अंतर पायी चालून गेवराईच्या चिंतेश्वर विद्यालयात जातात. ऊन, वारा, पाऊस यांचा त्यांना सामना करावा लागतो. यामुळे अनेक वेळा शाळा बुडवावी लागते. शिवाय त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटनांमुळे मनात भीतियुक्त वातावरण निर्माण झाल्याचे प्रीती गर्जे म्हणाल्या. शाळेत मुली गेल्या की, त्या परत येईपर्यंत चिंता लागते. त्यातच दहा कि.मी. पायपीट करून घरी आल्यावर मुले थकून जातात. त्यांची अभ्यास आणि जेवणाची मानसिकता राहत नाही. ते लगेच झोपून जातात. त्यामुळेच येथे स्कूल बसची आवश्यकता असल्याचे संतोष गर्जे यांनी सांगितले. ही त्यांची गरज ओळखून औरंगाबादचे ट्युलीप फाऊंडेशन, जाणिवा जपताना ग्रुप व नेक्स्ट फर्निचर सोल्युशनने पुढाकार घेत या मुलांना स्कूल बस मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले. हे प्रयत्न जवळपास यशस्वी होत आहेत. औरंगाबादमधील एमजीएम महाविद्यालयातील रुख्मिणी सभागृहात शनिवारी होणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून दानशूरांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. त्यांना घडवायचंय...या अनाथालयाला आम्ही अनेक वेळा भेट दिली आहे. त्यांचे हाल आणि पायपीट पाहिली. हे थांबविण्यासाठी त्यांना स्कूल बसची आवश्यकता असल्याचे लक्षात आल्यावर आम्ही लगेच अशी संकल्पना सुचवून मदतीचे आवाहन केले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे ‘ट्युलीप’चे डॉ. अमित शहा, डॉ. संदीप सिसोदे यांनी सांगितले. ‘जाणिवा जपताना’चे हरीश जाखेटे म्हणाले, या मुलांना सुविधा मिळाल्या तर ते भविष्यात नक्कीच मोठे अधिकारी बनतील, असा विश्वास आहे. रणजित कक्कड यांनीही या मुलांबद्दल सकारात्मक सहभाग नोंदवून मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.येथे करू शकता मदत...कार्यक्रमस्थळी संयोजकांकडे दानशूर लोक मदत करू शकतात. तसेच कार्यक्रमाचे संयोजक असणारे ग्रुप अथवा थेट साहाराचे संचालक प्रीती गर्जे व संतोष गर्जे यांच्याकडेही मदत करू शकता, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनाथ मुलांना मिळणार स्कूलबसचा ‘सहारा!’
By admin | Updated: April 27, 2017 05:58 IST