जयंत धुळप ल्ल अलिबागपाणलोट विकास योजनेच्या घोटाळ्यासंदर्भातील तीन कृषी अधिकाऱ्यांना लाच घेण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पाणलोट विकास योजनेतील भ्रष्टाचार व आर्थिक गैरव्यवहार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यावर लाचलुचपत प्रतिबंध विभागाने यामधील भ्रष्टाचाऱ्यांना गजाआड करण्याकरिता खर्डी (महाड) पाणलोट घोटाळ्याची खुली चौकशी सुरू केली आहे. गुरुवारी कर्जत कृषी विभागातील कृषी सहायक वर्ग-३चा अधिकारी रावसाहेब बाबासाहेब आंधळे (४३, मूळ रा. हवेली-पुणे), कृषी पर्यवेक्षक संदीप वसंत जाधव (३५, मूळ रा. मुरबाड-कल्याण) आणि कृषी सहायक वर्ग-३ अधिकारी नंदकुमार रघुनाथ पवार (५५, मूळ रा. लाडवली-कर्जत) या तिघांना सापळा रचून गुरुवारी संध्याकाळी ४.३० वाजता ३ लाख ४१ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई रायगड जिल्हा लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस उप अधीक्षक सुनील कलगुटकर यांच्या पथकाने केली.या प्रकरणातील प्रथम क्रमांकाचा आरोपी असणारा कर्जत कृषी अधिकारी वर्ग-२चा अधिकारी सुरेश डी. खेडकर हा फरार झाला असून, त्याला ताब्यात घेण्याकरिता पथक रवाना झाले असल्याची माहिती कलगुटकर यांनी दिली.या प्रकरणी अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक यास्मिन इनामदार करीत असल्याचे ते म्हणाले.
पाणलोट विकास योजनेत घोटाळा
By admin | Updated: July 24, 2015 01:09 IST