मुंबई : ब्रेक्झिटच्या धक्क्यातून सावरलेला सेन्सेक्स मंगळवारी वाढीसह बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही वाढ मिळविली. सेन्सेक्स १२१.५९ अंकांनी अथवा 0.४६ टक्क्याने वाढून २६,५२४.५५ अंकांवर बंद झाला. सोमवारी सेन्सेक्स ५.२५ अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा एनएसई ८,१00 अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. ३३.१५ अंकांची अथवा 0.४१ टक्क्याची वाढ मिळविणारा निफ्टी ८,१२७.८५ अंकांवर बंद झाला. मान्सून चांगली प्रगती करीत असल्याच्या वृत्तामुळे ग्राहक वस्तू विभागातील एचयूएल आणि आयटीसी यासारख्या बड्या कंपन्यांचे समभाग ३.२५ टक्क्यांपर्यंत वाढले. लुपीनचा समभाग सर्वाधिक ४.३९ टक्क्यांनी वाढला. त्याखालोखाल सिप्ला, कोल इंडिया, भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा यांचे समभाग वाढले. सेन्सेक्समधील ३0 कंपन्यांपैकी १९ कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले. युरोपातील बाजारांत तेजी दिसून आली. आशियाई बाजार वाढीसह बंद झाले. (प्रतिनिधी)
धक्क्यातून सावरला बाजार
By admin | Updated: June 29, 2016 04:32 IST