पुणो : पुणो विद्यापीठातील कामकाज आता ‘सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ’ या नावाने सुरू झाले असून टप्प्याटप्प्याने तशा सुधारणा करण्यात येतील, असे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले. येत्या 9 ऑगस्टला विद्यापीठाच्या नामविस्ताराचा सोहळा होणार आहे.
सावित्रीबाई फुले पुणो विद्यापीठ या नावाने कामकाजाला सुरूवात केली आहे. यापूर्वी पुणो विद्यापीठ या नावाने ज्या संस्था, परदेशी विद्यापीठांशी करार झाले आहेत, त्यांना पत्र पाठवून नावात बदल झाल्याचे कळविण्यात येईल, असे डॉ. गाडे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर नवीन नाव देण्यासाठीही तयारी सुरू करण्यात आली आहे. पुणो विद्यापीठाच्या ‘लोगो’बाबत काही निर्देश नसल्याने यापूर्वीचाच लोगो राहील. येत्या 9 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता विद्यापीठात नामविस्ताराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विद्यापीठातील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही यादिवशी केले जाणार आहे. राज्यपाल व विद्यापीठाचे कुलपती डॉ. के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या
प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असल्याचे डॉ. गाडे यांनी सांगितले.