ठाणे : ठाण्यात प्रथमच होणारे २९ वे अ. भा. स्वा. सावरकर साहित्य संमेलन एप्रिल महिन्यात होणार आहे. या संमेलनाची तारीख जाहीर झाली असून २१, २२, २३ एप्रिल रोजी हे संमेलन ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये रंगणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी सावरकरांची पुण्यतिथी असल्याने त्याला लागूनच सावरकर साहित्य संमेलन घेण्याचे आयोजकांचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी २४, २५, २६ फेब्रुवारी या तारखांवर आयोजकांनी भर दिला होता. मात्र, महापालिका निवडणुकांमुळे संमेलनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. अखेरीस २१, २२, २३ एप्रिल ही तारीख संमेलनासाठी निश्चित केली आहे. सांस्कृतिक चळवळीत ठाण्याचे मोठे योगदान आहे. या सांस्कृतिक नगरीत २०१० साली ८४ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन पार पडले तर २०१६ साली ९६ वे अ. भा. मराठी नाट्य परिषद पार पाडले. आता २०१७ साली २९ वे अ.भा. स्वा. सावरकर साहित्य संमेलन होणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्राबाहेर गोवा, हैदराबाद, गुजरात यांसारख्या ठिकाणी हे संमेलन घेण्यात आले आहे. गतवर्षी हे संमेलन रत्नागिरी येथे झाले होते आणि आता हा मान ठाणे शहराला मिळाला आहे. या संमेलनाच्या वातावरण निर्मितीसाठी स्वा. सावरकर प्रतिष्ठान, ठाणे आयोजित १८ व १९ मार्च रोजी महाविद्यालयीन गट व खुल्या गटासाठी विविध स्पर्धांचे मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे येथे आयोजन केले आहे. सावरकर एक द्रष्टा पुरूष, सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टीकोन, वर्तमानकाळात सावरकरांचे विचार या विषयांवर महाविद्यालयीन गटासाठी अभिवाचन, प्रासंगिक कथा - कथाकथन व वक्तृत्व स्पर्धा (मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत), सावरकर एक साहित्यिक, सावरकर एक द्रष्टा पुरूष, सावरकर एक क्रांतिकारक या विषयांवर खुल्या गटासाठी नाट्यप्रवेश, वक्तृत्व स्पर्धा (मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत) होणार आहे. (प्रतिनिधी)>वक्तृत्व स्पर्धेसाठी आयत्यावेळी विषय; विजेत्यांना मिळणार रोख रक्कमउत्स्फुर्त वक्तृत्व स्पर्धेला विषय आयत्यावेळी देण्यात येणार आहे. सावरकर एक साहित्यिक, सावरकर एक द्रष्टा पुरूष, सावरकर एक क्रांतिकारक, मला भावलेले सावरकर या विषयांवर खुल्या गटासाठी निबंध स्पर्धा (मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेत) आयेजित केली आहे. १००० ते १२०० शब्द मर्यादीत स्वहस्ताक्षरात निबंध २५ मार्च पूर्वी देण्याचे आवाहन केले आहे. सर्व विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम १००० रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम ७५० रुपये, मानचिन्ह व प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक रुपये ५०० मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धेचा निकाल संमेलनात जाहीर केला जाणार आहे. नाव नोंदणी १५ मार्च पर्यंत १०१, अस्पि मेन्शन, सारस्वत कॉ. ओप. बँक जवळ, रामवाडी, नौपाडा, ठाणे (पू.) येथे करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ठाण्यात रंगणार सावरकर साहित्य संमेलन
By admin | Updated: March 1, 2017 03:51 IST