सातारा/मुंबई : कऱ्हाड दक्षिणमधील काँग्रेसचे अतुल भोसले यांनी आज, बुधवारी रात्री मुंबई येथे विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांच्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.कृष्णा उद्योग समूहाचे अतुल भोसले व त्यांचे अनेक सहकारी आज, बुधवारी मुंबईत दाखल झाले. विनोद तावडे यांच्या निवासस्थानी त्यांची चर्चा झाली. यावेळी सांगलीचे खासदार संजयकाका पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार मधू चव्हाण उपस्थित होते. ‘कऱ्हाड दक्षिण’मधील राजकीय वातावरणासंदर्भात माहितीची देवाण-घेवाणही झाली. त्यानंतर अतुल भोसले व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. २००९ मध्ये अतुल भोसले कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार होते. त्यावेळी आमदार बाळासाहेब पाटील यांनी बंडखोरी करून विजय मिळविला होता. त्यानंतर भोसले काँग्रेसमध्ये परतले. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी ‘कऱ्हाड दक्षिण’मध्ये निवडणुकीची तयारीही केली होती. याच दरम्यान, मुख्यमंत्री चव्हाण हे याच ठिकाणी इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हापासून चव्हाण-भोसले गटांत अंतर पडत गेले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांविरोधात तगडा उमेदवार देऊ, अशी घोषणा विनोद तावडे यांनी साताऱ्यात केली होती. (प्रतिनिधी)
सातारा--अतुल भोसलेंचा ‘भाजप’मध्ये प्रवेश
By admin | Updated: September 25, 2014 00:32 IST